वाहनधारक-नागरिकांना त्रास : प्रशासनाचे दुर्लक्ष
वार्ताहर /किणये
बेनकनहळ्ळी येथील मुख्य रस्त्यावर गटारीचे सांडपाणी येऊ लागले आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांसह नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्राम पंचायत व संबंधित खात्याच्या अधिकाऱयांचे याकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांतून होत आहेत.
बेनकनहळ्ळी येथील केंबाळी नाल्याची समस्या गंभीर बनली आहे. अतिवृष्टी झाल्यास या नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर येते. तसेच नाल्यात केरकचरा टाकण्यात आला आहे. झाडेझुडुपे वाढलेली आहेत. या नाल्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या नाल्याची समस्या असतानाच आता त्यात अधिक भर होऊ लागली आहे ती म्हणजे गटारीचे सांडपाणी थेट रस्त्यावर येऊ लागले आहे.
गावाजळील ब्रह्मलिंग मंदिराकडे जाणाऱया रस्त्याच्या बाजूला ज्योतीनगर, क्रांतीनगर इथून येणाऱया गटारीचे सांडपाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. तसेच विजयनगर परिसरातील सांडपाणी केंबाळी नाल्याकडे सोडण्यात आले असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे.
अन्य भागातून येणाऱया सांडपाण्यामुळे मुख्य रस्त्यावर दुर्गंधी पसरू लागली आहे. यावर संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी तोडगा काढावा, अशी मागणी बेनकनहळ्ळी गावातील नागरिकांतून होत आहे.









