दुर्गंधीमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त
बेळगाव : नाथ पै सर्कल, शहापूर येथील भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या गटारी सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे गटारीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहात असून परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहापूरच्या मुख्य चौकातच अशाप्रकारे दुर्गंधी पसरली असल्याने नागरिक तसेच व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. स्थानिक नगरसेवकांनी ही समस्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कामाला सुरुवात झाली. मात्र, हे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना फटका बसत आहे. सध्या मान्सूनपूर्व पावसामुळे सर्वत्र चिखल झाला असताना शहापूर नाथ पै सर्कल येथे सांडपाणी पसरून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. सध्या डेंग्यू, मलेरिया यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.









