अन्यथा जि. प.बांधकाम सावंतवाडी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार
(साटेली भेडशी प्रतिनिधी )
रस्त्यालगतच्या गटाराची चुकीच्या पध्दतीने व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे भेडशी येथील ग्रामस्थ शिवदास मणेरकर यांच्या घरात गटारातील पाण्याचा निचरा होत असून घरात राहणेही अवघड बनले आहे याबाबत वेळोवेळी तक्रार पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
भेडशी खालचा बाजार ते खानयाळे रस्त्यालगत श्री.मणेरकर यांचे घर आहे.मागील चार वर्षांपूर्वी या रस्त्यालगतच्या गटारामधून खाजगी मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने जेसीबीच्या साह्याने खोदाई करण्यात आली त्यावेळी ही खोदाई करताना यामुळे भविष्यात नुकसान होणार याबाबत कल्पना दिली होती मात्र त्यावेळी कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी खोदाई करण्यात येईल असे सांगितले मात्र खोदाई केल्यानंतर केबल टाकल्यावर फक्त त्यावर माती टाकण्यात आली.त्यामुळे गटारच नाहीसा झाल्याने व रस्ताची एक बाजू उखडल्याने पावसाळ्यात हे पाणी गटारात न जाता रस्त्यालगत असलेल्या शिवदास मणेरकर यांच्या घरात जात असून घरात राहणे अवघड बनले आहे.व घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.ही स्थिती मागील तीन वर्षांपासून आहे याबाबत स्थानिक ग्रामपंचायत,जि. प.बांधकाम विभाग ,आमदार दिपक केसरकर यांचेही लक्ष वेधले. त्यावेळी ग्रामपंचायत कडून पक्केगटार कामाचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला तो प्रस्ताव सादरही केला मात्र याकडेही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या पावसाळ्यात पुन्हा गटारातील पाण्याचा निचरा थेट घरात असून घरात राहणे अवघड बनले आहे.येत्या आठ दिवसात गटार व्यवस्थित न केल्यास ,जि. प.बांधकाम उपविभाग सावंतवाडी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.









