कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा : समस्या निवारण करण्याची मागणी
बेळगाव : जालगार गल्ली येथील लालबहाद्दुर शास्त्राr चौक परिसरातील गटारी तुडुंब भरून रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तर पाण्याचा निचरा सुरळीत करण्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याबद्दल स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जालगार गल्ली येथील लालबहाद्दुर शास्त्राr चौक व परिसरातील गटारीचे सांडपाणी जाण्यासाठी रस्त्यावर सीडीवर्क करण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये कचरा अडकून पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी गटारींमध्ये साचले आहे. परिणामी गटारी तुडुंब भरून सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तर नागरिकांना सांडपाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. जवळच महानगरपालिकेचे बिट कार्यालय आहे. तरी देखील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. जालगार गल्लीमध्ये शनिवारचा आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. त्यामुळे बाजारादिवशी गर्दी होते. तत्पूर्वी मनपाने याकडे लक्ष देऊन सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून करण्यात येत आहे.









