गटारीच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने डबके : रोगराई पसरण्याचा धोका
बेळगाव : कणबर्गी येथे मागील तीन ते चार महिन्यांपासून सांडपाणी घरासमोर साचून राहिल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. काँक्रीटच्या गटारी करण्यात आल्या. परंतु, सांडपाणी निचरा होण्यास मार्ग नसल्याने एकाच ठिकाणी सांडपाणी साचले असून डबके तयार झाले आहे. यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून रोगराईची शक्यता वर्तवली जात आहे. ज्योतिर्लिंग गल्ली, तिसरा क्रॉस येथे काही महिन्यांपूर्वीच काँक्रीटच्या गटारी करण्यात आल्या. गटारी करताना सांडपाणी निचरा कोठे होणार? याचा विचार न करताच गटारींचे बांधकाम झाले. उतारावरून येणारे सर्व सांडपाणी आता एकाच ठिकाणी साचत आहे. तिसरा क्रॉसच्या पुढे शेती असल्यामुळे शेतकऱ्याने सांडपाणी आपल्या शेतात घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सांडपाणी एकाच ठिकाणी साचले असून त्याचे डबके तयार झाले आहे. घरासमोर सांडपाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करणेही अवघड होत आहे. या सांडपाण्यातूनच वाट काढत नागरिकांची ये-जा सुरू आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील या समस्येची दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानकांनी केला आहे. सांडपाण्याचा योग्य तऱ्हेने निचरा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.









