दुर्गंधीमुळे शिक्षकवर्गातून संताप व्यक्त : तातडीने दुऊस्तीची मागणी
बेळगाव : क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज कार्यालयात येणाऱ्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना ही समस्या दिसत नाही का? असा प्रश्न शिक्षकांमधून विचारला जात आहे. बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये बेळगाव विभागातील शिक्षकांची ये-जा असते. वैयक्तिक कामासोबतच शाळेच्या कामाकरिता शिक्षकांना कार्यालयात यावे लागते. याबरोबरच कार्यालयामध्ये 30 ते 40 पुरुष व महिला कर्मचारी आहेत. स्वच्छतागृहातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी ठिकठिकाणी चेंबर्स बसविण्यात आली आहेत. वाहने पार्किंग केली जात असलेल्या ठिकाणीच एक चेंबर ओव्हरफ्लो होत असून सांडपाणी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहत आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या शिक्षक तसेच नागरिकांना सांडपाण्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबरोबरच कार्यालयातील स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली असून जिल्हा शिक्षणाधिकारी या समस्येकडे केव्हा लक्ष देणार, असा प्रश्न शिक्षकांमधून विचारण्यात येत आहे.









