दुरुस्तीकडे दुर्लक्ष : परिसरात दुर्गंधीचे वातावरण
बेळगाव : एकीकडे शहरातील ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी दरमहा 30 ते 40 लाख रुपये खर्ची घातले जात असले तरी दुसरीकडे ड्रेनेज समस्या मात्र जैसे थे आहे. ठिकठिकाणी ड्रेनेज तुंबून सांडपाणी बाहेर पडत असल्याने दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. आरपीडी रोडवरील ड्रेनेज तुंबून सांडपाणी रस्त्यावरून वहात असले तरी या दुरुस्तीकडे महापालिकेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल धरून ये-जा करण्याची वेळ आली आहे. शहरातील ड्रेनेज लाईन अत्यंत जुनी असून ती वारंवार तुंबण्यासह नादुरुस्त होत आहे. नवीन ड्रेनेज लाईन घालण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ड्रेनेजची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत आहे.
याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून ठिकठिकाणी ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार सुरू आहेत. आरपीडी रोडवरील ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी झाकणातून बाहेर पडत आहे. सदर पाणी रस्त्यावरून वाहत जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरून अनेक महाविद्यालये असून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची ये-जा असते. त्याचबरोबर रहदारीही कायम असते. पण ड्रेनेजच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामधून सुसाट वेगाने वाहन चालवत असल्याने पादचाऱ्यांच्या अंगावर सांडपाणी उडून जाण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे तातडीने ड्रेनेजची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.









