कोल्हापूर :
कोल्हापूरच्या सौंदर्याचे मुख्य आकर्षण असणाऱ्या ऐतिहासिक रंकाळा तलाव आता प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे. अनेकवेळा तलावात थेट सांडपाणी मिसळत आहे. तसेच तलावात मोठ्या प्रमाणात जनावरे आणि कपडे धूतले जात असल्याने पाण्याची गुणवत्ता ढासळत चालली आहे. यावर उपाय योजनांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
हिरवेगार पाणी, शेवाळ, दुर्गंधी, मोठ्या प्रमाणात टाकलेला कचरा यामुळे रंकाळा तलावाचे सौंदर्याचे विद्रूपिकरण झाले आहे. रंकाळा तलावामध्ये मिसळणारे सांडपाणी थांबल्याचे दावे केले असले तरी, आजही काही प्रमाणात सांडपाणी थेट तलावात मिसळत आहे. वळवाचा पाऊस झाल्यानंतर शाम सोसायटी येथील नाला तसेच इतरही ठिकाणच्या नाल्यातून सांडपाणी तलावात मिसळले जाते.
- स्थानिकांसह पर्यटकांचीही जबाबदारी
रंकाळा तलावाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात, स्थानिक नागरिकही येथे फिरण्यासाठी येतात. रंकाळा तलावाचा परिसर व चौपाटी मोठी असल्याने फेरिवाल्यांची संख्यादेखील जास्त आहे. मात्र अनेकदा पर्यटकांसह स्थानिक नागरिकही खाद्यपदार्थ, प्लास्टिक रॅपर, गुटखा माव्याच्या पुड्या, पाण्याच्या बाटल्या, दारुच्या बाटल्या तसेच घरातील नको असलेल्या वस्तू थेट रंकाळयात टाकतात. यामुळे रंकाळ्याचे विद्रूपीकरण होत आहे. याशिवाय फेरिवाल्यांनी देखील जबाबदारी घेऊन कचरा तलावात न टाकता तो एका ठिकाणी गोळा करुन कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
- इरानी खनीजवळील ऑक्सिजन पार्क बनला मद्यपींचा अड्डा
इरानी खनीजवळील निसर्गरम्य ऑक्सिजन पार्क मद्यपींचा अड्डा बनला आहे. या परिसरामध्ये मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे प्लास्टिकचे ग्लास, पत्रावळ्या, पाण्याच्या बाटल्या, दारुच्या बाटल्या यांचा खच साचलेला असतो. पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन कारवाई केली पाहिजे, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह रंकाळा प्रेमींकडून होत आहे.
- हर्बल ट्रिटमेंटचा प्रकल्पाला मुहूर्त केव्हा
महापालिका प्रशासनाने सुमारे 20 कोटींच्या निधीतून रंकाळा तलावाच्या सुशोभिकरणाची कामे केली आहेत. परंतू तलावातील प्रदूषित पाणी स्वच्छ करण्याकडे कानाडोळा केला आहे. हर्बल ट्रिटमेंटचा प्रकल्पाचा प्रस्ताव पाठवला असून यासाठी निधी अद्यापी मिळालेला नाही. बाह्या सुशोभिकरणावर कोट्यावधींचा खर्च करण्याबरोबरच तलावातील प्रदूषित पाण्यावरही उपययोजना करण्याची गरज आहे.








