तातडीने गटार स्वच्छ करण्याची मागणी : परिसरात दुर्गंधी
बेळगाव : शहर-उपनगरात गटारी व ड्रेनेजची समस्या गंभीर बनत चालली आहे. न्यायालयाच्या गेटसमोरील गटारी तुंबल्या असल्या तरी त्या स्वच्छ करण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले असल्याने गटारीतील सांडपाणी मुख्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या वकिलांसह अशिलांना सांडपाण्यातून वाट शोधावी लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. न्यायालयासमोरील गटारींची स्वच्छता करण्यात न आल्याने ठिकठिकाणी गटारीत केरकचरा अडकला आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले असल्याने जागा मिळेल तेथून सांडपाणी बाहेर पडत आहे. मुख्य रस्त्यावरच सांडपाणी पसरले असल्याने वाहनचालकांना सांडपाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. तसेच न्यायालयात येणाऱ्या वकील आणि त्यांच्या अशिलांना सांडपाण्यातूनच वाट शोधावी लागत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून तातडीने गटारीची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.









