गटारी स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष
बेळगाव : नेहरूनगर येथील बसवाणा मंदिर येथे सांडपाणी गटार भरून रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महानगरपालिका लक्ष देणार का? असा प्रश्न रहिवाशांसह वाहनधारकांतून उपस्थित केला जात आहे. नेहरूनगर परिसरातून येणारे सांडपाणी सदाशिवनगर-अजमनगर मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे सांडपाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या कायम असून गटारी स्वच्छता न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्थानिक नागरिकांतून सांगण्यात येत आहे. गटारीच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी सुरळीत व्यवस्था नसल्यामुळेच सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याची तक्रारही करण्यात येत आहे. महानगरपालिकेकडून शहर स्वच्छतेचा डांगोरा पिटला जात असला तरी अशा समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या सांडपाण्यामुळे रस्ताही खराब होत आहे. याकडे महानगरपालिका गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मंदिराजवळच गलिच्छ वातावरण निर्माण झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महानगरपालिकेने याची तातडीने दखल घेऊन सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.









