महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष : पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण : गटारींचे अयोग्य बांधकाम कारणीभूत
बेळगाव : जुन्या कपिलेश्वर तलावात ड्रेनेज आणि गटारीचे सांडपाणी तुंबले असल्याने तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांची पैदास देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे याचा त्रास परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिकेने दुर्लक्ष केले असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. कपिलेश्वर येथील जुन्या श्री गणेश विसर्जन तलावाला मोठी परंपरा आहे. सदर तलावात गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक श्री गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. नवीन तलाव बांधण्यात आल्यापासून जुन्या तलावाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अनेक समस्यांनी जुन्या तलावाला घेरले आहे. यापूर्वी तलावाच्या परिसरातून गेलेली गटार व्यवस्थित होती. मात्र, काही वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेली गटार अशास्त्राrय असल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
अशास्त्राrय पद्धतीने गटारीचे बांधकाम केल्याने समस्या
अशास्त्राrय पद्धतीने गटारीचे बांधकाम करण्यात आले असल्याने तलावाजवळ गटारीचे पाणी तुंबून ओसंडत आहे. तसेच ड्रेनेजचे पाणीही त्याच ठिकाणी झिरपत असल्याने तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी तलावाची महापालिकेकडून स्वच्छता केली जाते. मात्र, त्यानंतर वर्षभर तलावाच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने तलावाची अत्यंत दयनीय अवस्था बनली आहे. गटारीतील पाणी पुढे वाहून जाण्याऐवजी जुन्या तलावात शिरत आहे. त्यामुळे घाणपाण्यावर तवंग साठून दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांची पैदासही मोठ्या प्रमाणात होत असल्याने याचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना सहन करण्याची वेळ आली आहे.
सांडपाण्याचा प्रश्न न सोडवल्यास आंदोलन
याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी ही समस्या सोडविण्याकडे महापालिका तसेच स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केले आहे. कपिलेश्वर जुना तलाव नगरसेवक राजू भातकांडे आणि वैशाली भातकांडे यांच्या दोन्ही प्रभागांमध्ये मोडतो. त्यामुळे तलावाचा विकास नेमका कोणी करायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तातडीने या समस्येकडे लक्ष घालून सांडपाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
तातडीने समस्या मार्गी लावा
अलीकडेच बांधण्यात आलेल्या गटारी अशास्त्राrय पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत. गटारींची लेव्हल व्यवस्थित नसल्याने भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली येथून येणारे सांडपाणी पुढे जाण्याऐवजी ते तलावात शिरत आहे. सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे अवघ्या दहा मिनिटात संपूर्ण तलाव सांडपाण्याने भरला. यामुळे परिसरातील दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. याकडे महापालिकेने लक्ष देऊन तातडीने समस्या मार्गी लावावी.
– संदीप देसाई, स्थानिक रहिवासी









