गावात चार दिवसाआड पाणीपुरवठा : महिलांचा घागर मोर्चा, पाण्यासाठी वणवण : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
बेळगाव : बेकिनकेरे येथे पाणीसमस्या गंभीर बनली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी चोहीकडे भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, गावात चार पाच दिवसाआड पाणी येत असल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत. पाणीसमस्येने हैराण झालेल्या ग्रामस्थ-महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून आंदोलन छेडले आहे. शिवाय येत्या चार दिवसात सुरळीत पाणीपुरवठा करावा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा दिला आहे. उन्हाळा आला की, दरवर्षी गावात पाणी समस्या उद्भवते. यंदा वळिवाने दगा दिल्याने विहिरी, तलाव आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. इच्छूक उमेदवार गावात येऊन आश्वासनांचा पाऊस पाडत आहे. मात्र प्रत्यक्षात गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात मुबलक पाणी नसल्याने गावकऱ्यांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. नवीन ग्राम पंचायतीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान या इमारतींसाठी गावातील पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणीसमस्या अधिक तीव्र जाणवू लागली आहे. गावात पाणी नाही आणि इमारत बांधकामासाठी मनमानीपणे पाण्याचा वापर केला जात आहे, असा आरोपदेखील महिला ग्रामस्थांनी आंदोलनादरम्यान केला आहे. गावात एक सार्वजनिक विहीर आणि दोन कूपनलिकेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र विहीर आणि कूपनलिकांनीदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळेनासे झाले आहे. दरम्यान, महिला ग्रामस्थांना दोन तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. पाणीसमस्या तीव्र झाल्याने लहान मुला-बाळांपासून आबालवृद्धांनादेखील सायकल आणि डोक्यावरून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. इतकी गंभीर पाणी समस्या असूनदेखील लोकप्रतिनिधींने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे.
मिक्सर, कुकर, डबे नकोत, पाणी द्या पाणी द्या…
निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावोगावी प्रचाराला जोर आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आश्वासने दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात गावच्या पाणी प्रश्नांबाबत कोणीच लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. मतदारांना खूष करून मते घेण्यासाठी मिक्सर, कुकर, डबे आणि इतर साहित्य वाटप केले जात आहे. मात्र पाणी समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्हाला मिक्सर, डबे, कुकर नको, पाणी द्या पाणी, असा संतापही ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.









