भटकंती थांबविण्यासाठी तातडीने ग्राम पंचायतीने लक्ष देणे गरजेचे
वार्ताहर /उचगाव
कल्लेहोळ येथील कलमेश्वरनगर (नवीन वसाहत) या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असून, येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सुळगा (हिं.) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या कल्लेहोळ या गावातील बऱ्याचशा नागरिकांनी गावाच्या शेजारील असलेल्या माळ जमिनीमध्ये नवीन वसाहत थाटली आहे. या भागात गावापेक्षा अधिक लोकसंख्या या नवीन वसाहतीत विखुरलेली आहे. सदर भाग उंचावर आणि खडकाळ असल्याने तसेच जवळपास खडीमशीनच्या अनेक कॉरी असल्याने या नवीन वसाहत भागात विहीर, कूपनलिका यशस्वी होत नाहीत. विहीर व कूपनलिकेमध्ये पाणी राहात नाही. यामुळे येथील नागरिकांना ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेवरच अवलंबून राहावे लागते. मात्र सध्या पाण्याची टंचाई असल्याने येथील नागरिकांना आठवड्यातून एकदा नळाला पाणी येते. आणि यावर समाधान मानावे लागते. मात्र रोजच्या दैनंदिन कामासाठी पाणी मिळत नसल्याने याबरोबरच येथे शेतकरी अनेक कुटुंबे असल्याने जनावरांसाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते.
अल्प प्रमाणात पाणी येत असल्याने गैरसोय
सध्या पाणीच नसल्याने येथील नागरिकांना जिथून मिळेल तेथून पाणी आणण्याची वेळ आली आहे. अनेक नागरिक टँकरने विकत पाणी आणत आहेत. याच भागात पाण्याचा जलकुंभ आहे. या जलकुंभाचे पाणी कल्लेहोळ मुख्य गावांमध्ये सोडण्यात येते. सदर जलकुंभ हा उंचावर असल्याने गावातील नागरिकांना प्रेशरने पाणी पुरवठा होतो. मात्र या कलमेश्वरनगर, नवीन वसाहत भागामध्ये म्हणावा तशा प्रेशरने पाणी येत नसल्याने पाणीपुरवठा अल्प प्रमाणात मिळत असतो, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवा
सध्या नागरिक शेतवडीतून किंवा जिथे मिळेल तेथून भटकंती करून पाणी आणत आहेत. सध्या नळपाणी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतच्या दोन सार्वजनिक विहिरी आणि कूपनलिका असून, यामार्फत जमेल तेवढे पाणी सोडून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र पुढील दोन महिने पिण्याच्या पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष होणार असून, यासाठी उपाययोजना ग्रामपंचायतीने तातडीने राबवाव्यात आणि नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.









