झोजिलामध्ये तापमान उणे 18 अंशांवर : 9 जिल्ह्यात पारा ‘मायनस’मध्ये
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या बहुतांश भागात पारा शून्य अंशाच्या खाली पोहोचला आहे. या मोसमातील सर्वात थंड रात्रीची नोंद श्रीनगरमध्ये झाली. येथील तापमान उणे 4.1 अंश नोंदवले गेले. श्रीनगरसोबतच दक्षिण काश्मीरमधील शोपियान, अनंतनाग, पहलगाम येथेही तापमान उणे 6 अंशांपर्यंत घसरले आहे. झोजिला येथील तापमान उणे 18 अंशांपर्यंत घसरले आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने हिमवर्षाव वाढण्याचा इशारा दिला आहे. 8 डिसेंबरच्या रात्रीपासून 9 डिसेंबरच्या सकाळपर्यंत पर्वतीय भागात हलका पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले. लेह, कारगिल, द्रास आणि झोजिला येथील तापमान दिवसेंदिवस घसरत चालले आहे. झोजिलाचे तापमान शनिवारी उणे 18 नोंदवण्यात आले. त्याचवेळी कारगिल आणि लेहची स्थितीही बिकट आहे. लेहमधील तापमान उणे 10 अंशांपर्यंत घसरले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, काश्मीरमधील लोकांना सध्या या थंडीपासून दिलासा मिळण्याची आशा नाही. पुढील काही दिवस कडाक्याची थंडी पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पर्यटकांनाही सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.









