रत्नागिरी :
तालुक्यातील निवळी-जयगड रस्त्यावरील जाकादेवी-तरवळ येथे ट्रक-टेम्पोमध्ये समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले. उपचारासाठी प्रथम त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
अमजद मुल्ला जांभारकर (५०), मुजक्कीर अमजद जांभारकर (२५) व फिरदोस न्यायद खळे (४३, रा. तिघेही पडवे ता. गुहागर) अशी जखमींची नावे आहेत. अमजद हे १५ जुलै रोजी टेम्पोने रत्नागिरी-जाकादेवी असे या मार्गाने जात होते. सकाळी ६ च्या सुमारास समोरुन येणाऱ्या ट्रकने (एमएच ०९ जीजे ४३४७) टेम्पोला जोराची धडक दिली. यात टेम्पोमधील अमजद जांभारकर, मुजक्कीर जांभारकर व त्यांच्यासोबत असणारी महिला फिरदोस खळे या गंभीर जखमी झाल्या. अपघाताच्या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. येथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनेचा पंचनामा करुन अपघाताची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.








