वार्ताहर /केपे
दहावीच्या परीक्षेत 35 सरकारी शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामुळे सरकारी शाळा म्हटल्या की, पाठ फिरवणाऱयांना आता आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. विशेष म्हणजे मोरपिर्लासारख्या आदिवासीबहुल भागातील सरकारी शाळेचा सलग सातव्यांदा 100 टक्के निकाल लागला आहे.
या विद्यालयातून एकूण 40 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 9 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 23 प्रथम श्रेणीत, तर 8 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एकही विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेला नाही. सलोनी गावकर ही विद्यार्थिनी 84.5 टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिली आली असून प्रज्योत गावकर 83.16 टक्के, रोलिशा वेळीप 82.16 टक्के, स्वयंम वेळीप 81.33 टक्के, सानिया वेळीप 79.33 टक्के, श्रेया वेळीप 79 टक्के, स्वानेश वेळीप 79 टक्के या विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश मिळविले आहे.
हे यश सहजासहजी त्यांना प्राप्त झालेले नाही, असे मुख्याध्यापिका मॉरेना मिरांडा यांनी सांगितले. या विद्यालयात शिकायला येणारे 99 टक्के विद्यार्थी आदिवासी समाजातील असून त्यांना शाळेत मिळणाऱया शिक्षणावर अवलंबून राहावे लागते. तसेच विद्यार्थ्यांना घरी एवढे काम असते की, त्यांना अभ्यासाकडे संपूर्ण वेळ लक्ष देणेही शक्य होत नाही. त्यामुळे दुपारी तीनपर्यंत त्यांना शाळेतच बसवून त्यांच्याकडून आम्ही अभ्यास व उजळणी करून घेत होतो, असे त्यांनी सांगितले. माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.









