ऐगळी पोलिसांकडून चौकडीला अटक, 17 लाखांची रोकडही जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
नोटा दुप्पट करून देण्याचे सांगून हालळ्ळी, ता. अथणी येथील एका रहिवाशाला 17 लाख 50 हजार रुपयांना ठकवल्याच्या आरोपावरून ऐगळी पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 17 लाख रुपये रोख रक्कम व गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
मेहरून अल्ताफ सरकावस (वय 48) मूळची राहणार घटप्रभा, सध्या राहणार जवाहरनगर कोल्हापूर, इमामसाब राजेसाब दरुबाई (वय 34) राहणार कमडोळी, जि. धारवाड, अक्षय शांतीनाथ आवटी (वय 30) राहणार डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली, विश्वास हरि पाटील (वय 40) राहणार पोहाली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत.
12 सप्टेंबर 2025 रोजी मेहरून या महिलेसह कारमधून आलेल्या चौकडीने हालळ्ळी येथील आमसिद्ध हणमंत पुजारी याला गाठून नोटा दुप्पट करून देण्याचे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून आमसिद्धने या चौकडीला 17 लाख 50 हजार रुपये रोकड दिली. त्याच्या बदल्यात एका बॅगमध्ये जुने कपडे घालून यामध्ये 34 लाख रुपये आहेत, असे सांगत ती बॅग आमसिद्धला देण्यात आली होती.
फसवणूक प्रकरणी ऐगळी पोलीस स्थानकात 13 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ऐगळीचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर सागनूर, कुमार हाडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चौघा जणांना अटक करून 17 लाख रुपये व कार जप्त केली आहे.









