जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील माडग्याळ सह सात गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी मिळावे म्हणून मायथळ कॉनल मधून चर काढून माडग्याळच्या तलावात पाणी सोडावे म्हणून शेतकऱ्यांची गेल्या तीन वर्षापासून मागणी होती. त्यास अनुसरून जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यानी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून चर खुदाई साठी शासनाच्या मशनरी उपलब्ध करून दिल्या. तसेच खासदार फंडातून बारा लाख रुपये डिझेल साठी दिले, गुरुवारी कामही सुरू झाले होते.
मात्र दुसऱ्याच दिवशी वन विभागाने सदरची जागा ही आमची आहे, म्हणून जागेवर येऊन काम बंद पाडले आहे. काम काम बंद पडतात शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. साहेब, खूप वाईट परिस्थिती आहे हो, काम बंद करू नका म्हणत, अधिकाऱ्यांचे पाय धरले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रोश केला. तरीही वन विभागाने हे काम सुरू होऊ दिले नाही. त्यामुळे 400 हून अधिक शेतकरी माळावर बसून आहेत. हा प्रश्न समोपचाराने न सुटल्यास शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.








