बडेकोळमठ घाटातील घटना : सुदैवानेच जीवितहानी टळली, चौघे जण किरकोळ जखमी
बेळगाव : भरधाव कंटेनर पलटी झाल्याने मागून येणारी सहा वाहने एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला. मंगळवारी दुपारी बेळगाव-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळमठ घाटात हा अपघात घडला. यामध्ये सुदैवानेच कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंटेनरमधील क्लिनरसह चौघेजण किरकोळ जखमी झाले. यात सात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने वाहने हटवून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून दिला. मंगळवारी दुपारी 3.30 च्या दरम्यान तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने हजेरी लावली. अशातच बेळगावहून धारवाडच्या दिशेने भरधाव वेगाने कंटेनर जात होता. बडेकोळमठ घाटातील उतारतीला चालकाने कंटेनर न्यूट्रल केले होते. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला. तसेच ब्रेक न लागल्याने कंटेनर महामार्गावर पलटी झाला. सदर अपघातग्रस्त कंटेनर काही अंतरापर्यंत फरफटत गेल्यानंतर मागून येणाऱ्या बसने करकचून ब्रेक दाबला आणि समोरील मोटारसायकलला धडक दिली.
त्यामुळे बसच्या पाठोपाठ येणाऱ्या आणखी दोन बसेस आणि दोन कंटेनर अशी एकूण सहा वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये केवळ सुदैवानेच कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एकूण सात वाहनांचे यामध्ये नुकसान झाले आहे. वाहनांची झालेली दुर्दशा पाहून एखादी मोठी दुर्घटना घडली असावी असे दृष्य पाहावयास मिळाले. अपघातानंतर बेळगाव-धारवाडकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली. अपघाताची माहिती समजताच हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुंद्रेश होळेण्णवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला. यावेळी एक गॅस टँकर पलटी झाला नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बडेकोळमठ घाटातील उतारतीला वारंवार लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी सदर अपघातप्रवण क्षेत्रात वाहनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मात्र सुसाट वेगाने निघालेली वाहने उतारतीला वळणावर पलटी होत आहेत. यापूर्वी देखील अनेकवेळा लहान मोठे अपघात घडले आहेत. याठिकाणी रस्ता देखील अरुंद असल्याने वाहनांसाठी ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. याबाबत महामार्ग पोलिसांकडून उपाययोजना हाती घेण्यासह वाहन चालकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.









