खडेबाजार पोलिसांची कारवाई
बेळगाव : एका मोटारसायकल चोराला अटक करून त्याच्याजवळून साडेतीन लाख रुपये किमतीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या सर्व मोटारसायकली बेळगाव शहर व उपनगरातून चोरल्याची कबुली संबंधिताने दिली आहे. अबुबकर सिकंदर सनदी (वय 22) मूळचा राहणार जनता प्लॉट, रुक्मिणीनगर सध्या रा. स्लम क्वॉर्टर्स श्रीनगर गार्डनजवळ असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, उपनिरीक्षक आनंद आदगोंड, ए. ए. शेट्टी, बी. एस. रुद्रापूर, ए. एम. जमादार, व्ही. ए. माळगी, बी. एल. सर्वी, बी. ए. करेगार, ए. एस. हेग्गण्णा आदींचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.
याकामी तांत्रिक विभागातील रमेश अक्की व एम. एस. काशिद यांचीही मदत लागली आहे. 31 डिसेंबर रोजी मोटारसायकल चोरी प्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अबुबकरला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता सात मोटारसायकली चोरल्याची कबुली त्याने दिली. खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 3, कॅम्प, काकती, बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातही त्याने प्रत्येकी 1 मोटारसायकल चोरली आहे. आणखी एक मोटारसायकल त्याने कुठून चोरली, याचा तपास करण्यात येत आहे. होंडा कंपनीची सीबी शाईन, ड्रीम युगा, दोन अॅक्टिव्हा, एक यामाहा, होंडा कंपनीची सीडी डॉन अशा एकूण 3 लाख 45 हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.









