हिरेबागेवाडी पोलिसांकडून ट्रक ताब्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
बेकायदा मांस वाहतूक करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दोघा जणांवर हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ट्रकमधून 7 हजार किलो जनावरांचे मांस पोलिसांनी जप्त केले असून कोंडसकोपजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.
एमएच 10, डीटी 2676 क्रमांकाच्या ट्रकमधून बेकायदा मांस वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोंडसकोपजवळ ट्रक अडवून तपासणी केली असता तब्बल 7 हजार किलो इतके मांस ट्रकमध्ये आढळून आले.
शुक्रवार दि. 26 जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. मांस वाहतुकीसाठी आवश्यक कसलाच परवाना त्यांच्याजवळ नव्हता. पोलिसांनी 5 लाख 60 हजार रुपये किमतीचे मांस जप्त केले आहे. महम्मदगौस नजीर शेख (वय 47), कल्लाप्पा रेवाप्पा कोळी (वय 45) दोघेही रा. सांगली यांना याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे.
मांस नेमके कोणत्या जनावरांचे आहे? याची तपासणी करण्यासाठी मांसाचे नमुने हैदराबादला पाठविण्यात येणार आहेत. जनावरांची बेकायदा कत्तल करून ही वाहतूक केली जात होती. पोलिसांनी दोघा जणांवर एफआयआर दाखल करून मांस जप्त केले आहे.









