वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2025 साली होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान भूषविणार आहे. सध्या भारतात सुरू असलेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील मानांकनातील आघाडीचे सात संघ पाकमधील चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भाग घेतील तर यजमानपद भूषविणारा पाकचा संघ हा या स्पर्धेतील आठवा संघ राहिल.
आयसीसीने 2021 साली झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या रूपरेषेमध्ये फेरबदल केला असून 2024 ते 2031 या कालावधीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक निश्चित केले आहे. 2025 आणि 2029 साली होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पारंपारिक स्वरूपामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या स्पर्धेत सहभागी होणारे चार संघ दोन गटात विभागण्यात आले असून प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरी गाठतील. तर त्यानंतर अंतिम सामना खेळविला जाईल. आयसीसीच्या कार्यकारणी समितीच्या 2021 साली झालेल्या बैठकीमध्ये पात्र फेरी स्वरूपाला अधिकृत मान्यता देण्यात आली होती. आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील गुणतक्त्यात विद्यमान विजेता इंग्लंडचा संघ दहाव्या स्थानावर आहे. त्यांनी या स्पर्धेत केवळ एक सामना जिंकून दोन गुण मिळविले आहेत. तर बांगलादेशचा संघ दोन गुणासह नवव्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांचे स्पर्धेतील तीन सामने बाकी आहेत. मात्र या स्पर्धेत उपांत्य फेरीसाठीच्या शर्यतीसाठी या दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. आयसीसीच्या या नव्या पद्धतीमध्ये अनेक त्रृटी जाणवतात. नेदरलँड्स आणि अफगाण हे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील गुणतक्त्यात अनुक्रमे आठव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. त्याचप्रमाणे भारतात सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आर्यलंड आणि झिम्बाव्बे आणि विंडीज आपली पात्रता सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांना पात्रतेची संधी मिळणार नाही.









