रामदुर्ग पोलिसांची कारवाई : सहा वाहने, दागिने जप्त, टोळीतील आणखी तिघे फरारी, तपास पथकाला पोलीसप्रमुखांकडून बक्षीस जाहीर

बेळगाव : एका अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला अटक करण्यात रामदुर्ग पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली असून सात जणांना अटक झाली आहे. या टोळीतील आणखी तिघेजण फरारी झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांकडून दरोड्यासाठी वारलेल्या चार कार, दोन मोटारसायकल, 188 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या टोळीतील गुन्हेगारांनी बन्नूरतांडा (ता. रामदुर्ग) येथील एका घरातून तब्बल 23 लाख रुपयांहून अधिक रोकड पळविली होती. रामदुर्गचे पोलीस निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, कटकोळचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धरामाप्पा उन्नद, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एल. टी. पवार, वाय. जी. कोटी, डी. एच. नदाफ, एम. एम. पडसलगी आदींचा समावेश असलेल्या विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी सात दरोडेखोरांना अटक केली आहे. खासीमसाब शेख, विजय लमाणी, मुक्तार शेख, प्रदोशी उस्ताद, महम्मदहुसेन शेख, जमीर मुनसी, महम्मद कैफ ऊर्फ कल्पना कोडकी अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. ते रामदुर्ग, कलादगी, जमखंडी, विजापूर येथील राहणारे आहेत. या सर्व सात जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
दि. 25 ऑक्टोबर 2022 रोजी मध्यरात्री बन्नूरतांडा (ता. रामदुर्ग) येथील चंद्रू शंकर रजपूत यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. कुटुंबीयांच्या तोंडात कपड्याचे बोळे कोंबून तलवारी व इतर शस्त्रांचा धाक दाखवून तिजोरीतील 23 लाख 69 हजार 900 रुपये रोख रक्कम व 6 लाख 30 हजार रुपये किमतीचे 148 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले होते. 8 फेब्रुवारी 2023 रोजी मुकेशकुमार प्रभूलालजी स्वालका (रा. अंजनेयनगर, रामदुर्ग) हे दुचाकीवरून जाताना त्यांची दुचाकी अडवून रामदुर्ग येथील मीनी विधानसौधजवळ डोळ्यात मिरचीपूड टाकून बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याजवळील 1 लाख 5 हजार रुपये रोकड, एक मोबाईल पळविल्याची घटना घडली होती. बन्नूरतांडा येथील दरोडा व रामदुर्ग येथील वाटमारी प्रकरणात याच टोळीचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. आणखी तिघेजण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरोडेखोरांच्या टोळीला अटक केलेल्या पथकाला जिल्हा पोलीसप्रमुखांनी 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.









