बुडालेल्यांमध्ये पाचजण लोंढा-बेळगावचे, दोघे पिंगुळी येथील : तिघांचे मृतदेह सापडले, अन्य चौघे बेपत्ता : दोघांना वाचविण्यात यश
प्रतिनिधी/ वेंगुर्ले
गेले आठ दिवस उधाणामुळे समुद्र खवळलेलाच आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथील मणियार कुटुंबीय लोंढा-बेळगाव येथील सुमारे 15 नातेवाईकांसह शिरोड्यातील वेळागर किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास दोन वाहनांमधून आलेल्या या दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी वेळागर किनाऱ्यावरील सुरुच्या बागेत दुपारी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन या कुटुंबातील मुलांनी वाळूत विविध प्रकारच्या खेळांचाही आनंद लुटला. स्थानिकांनी समुद्राच्या पाण्यात उतरू नका, समुद्राला ओढ आहे, अशी कल्पना त्यांना दिली होती. यातील काहींना पाण्यात उतरण्याचा मोह आवरता आला नाही. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास समुद्र खवळलेला आहे, याची कल्पना असतानाही धाडस करून या ग्रुपमधील नऊजण पाण्यात उतरले. कोणताही मोठा धोका संभवू नये, यासाठी खबरदारी घेत त्यांनी एकमेकांचे हातही पकडले होते.
पाण्यात उतरलेले अन्य सातजण मात्र बेपत्ता झाले. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास खोल समुद्रात दिसून आलेले तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. फरीन इरफान कित्तूर (वय 34), इबाद इरफान कित्तूर (वय 13 राहणार लोंढा, बेळगाव) व नमीरा आफताब अखतार (वय 16, राहणार अळणावर-धारवाड) अशी मयतांची नावे आहेत. इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय 36), इकवान इमरान कित्तूर (15, दोन्ही राहणार, लोंढा, बेळगाव), फरहान महम्मद मणियार (वय 25) व जाकीर निसार मणियार (वय 13, राहणार गुढीपूर-पिंगुळी-कुडाळ) हे चारजण समुद्रात बेपत्ता आहेत. सदर चारजणांचा राज वॉटर स्पोर्ट्सच्याबोटींच्या सहाय्याने रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र अंधार व पाण्याला अधिक ओढ असल्याने ही मोहीम रात्र आठ वाजता थांबविण्यात आली.
खोल पाण्यात न जाता अगदी जवळ किनाऱ्यावरच त्यांनी समुद्रातील पाण्यात समुद्रस्नानाचा आनंद लुटला. काहीवेळ त्यांनी मानवी साखळी करूनच पाण्यात मजा लुटली. सायंकाळी 4.45 वाजण्याच्या दरम्यान एक मोठी लाट येऊन किनाऱ्यावर आदळली. या लाटेत त्यांनी केलेली मानवी साखळी तुटली. ग्रुपमधील सगळे सदस्य विखुरले गेले. समुद्राच्या पाण्याची ओढ तीव्र गतीने वाढली होती. अनेकांच्या पायाखालील वाळू सरकू लागली आणि ते सर्व पाण्यात खेचले जाऊ लागले. काहीतरी मोठा धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच तेथे मोठा हाहाकार उडाला. स्थानिकांसह अनेकांनी तेथे धाव घेतली. मात्र बघता बघता यातील सातजण पाण्यात दिसेनासे झाले.
लोंढा-बेळगाव येथील इमरान अहमद मोहम्मद इसाक कित्तुर (42) हे समुद्र किनाऱ्यानजीकच पाण्यात स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्याच बाजूला एक युवती पाण्यात बुडत होती. स्थानिक रहिवासी आजू आमरे, आबा चिपकर, समीर भगत, नेल्सन सोझ व सूरज आमरे यांनी किनाऱ्यावर असलेल्या इमरान यांना तात्काळ पाण्याबाहेर काढले. त्यानंतर इमरान यांच्याच इसरा इमरान कित्तुर या 17 वर्षीय युवतीला त्यांनी पाण्याच्या बाहेर काढले. या दोघांच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. इसरा ही बेशुद्धावस्थेत असल्याने तिला आनंद नाईक यांनी आपल्या मोटारसायकलने तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
शिरोडा-वेळागर समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या चार व्यक्तींबाबतचा तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पोलीस हवालदार योगेश राऊळ, मनोज पऊळेकर, योगेश मांजरेकर, स्वप्नील तांबे, दीपा मठकर, प्रकाश कदम, योगेश सराफदार, योगेश राऊळ तसेच होमगार्डचे तालुका समादेशक संतोष मातोंडकर, महिला होमगार्ड श्रीमती डिसोजा यांच्यासह 12 होमगार्ड, परिसरातील पोलीस पाटील मधुसूदन मेस्त्राr, लक्ष्मण तांडेल, पांडुरंग पडवळ, सनी मोरजकर, प्राची पेडणेकर, मिताली शेटये, केशव कुडव, बाबुराव चोपडेकर, विश्वनाथ सोन्सुकर घटनास्थळी उपस्थित होते.
ही घटना समजताच माजी आमदार शंकर कांबळी, वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर, प्रथमेश परब, पांडुरंग नाईक, सुधीर नार्वेकर, रश्मी डिचोलकर, जगन बांदेकर, सागर मठकर, अर्चना नाईक नंदिनी धानजी, सागरतीर्थ ग्रामपंचायत सरपंच शेखर कुडव, रेडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य आजू आमरे, मातोंडचे ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद इंगळे आदींनी शोधकार्यात सहकार्य केले.
फरहान मणियारचा पुढच्या महिन्यात होता विवाह
पिंगुळी-गुढीपूर येथे गॅरेज व्यवसाय करणाऱ्या फरहान मणियार या युवकाचा नोव्हेंबर महिन्यात विवाह होता. यासाठीच कर्नाटक राज्यातील बेळगाव व धारवाड जिल्ह्यातील त्यांचे नातेवाईक फरहान यांच्या घरी आले होते. गेले दोन दिवस ते मणियार कुटुंबियांकडे वस्तीला होते. गुरुवारी या सर्वांनी मिळून वेंगुर्ले येथे पर्यटनाचा आनंद लुटला. शुक्रवारी शिरोड-वेळागर येथे हे सर्व पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. मात्र, घडलेल्या या दुर्दैवी घटनेत ज्याचा विवाह होता तो फरहानही अन्य सातजणांसमवेत समुद्राच्या पाण्यात ओढला गेला. त्याच्या सोबत त्याचा 13 वर्षीय जाकीर निसार मणियार हा चुलत भाऊही बेपत्ता झाला आहे.
वॉटर रोबोटिक क्राफ्ट असते तर..
समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी आता वॉटर रोबोटिक क्राफ्टचा वापर केला जातो. रिमोटवर चालणारा हा रोबोटिक क्राफ्ट समुद्रात सोडून बुडणाऱ्या पर्यटकापर्यंत पोहोचल्यावर त्याला पकडल्यावर पर्यटकाला किनारी आणणे शक्य होते. जिल्ह्यात प्रशासनाकडून समुद्र किनारी असलेल्या अकरा गावांना रोबेटिक वॉटर क्राफ्ट देण्यात आले आहेत. यात वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ, उभादांडा, शिरोडा, देवगड तालुक्यातील विजयदुर्ग, कुणकेश्वर, मालवण तालुक्यातील वायरी-भूतनाथ, तारकर्ली-काळेथर, देवबाग या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. शिरोडा-वेळागरसाठी हा वॉटर रोबोटिक वॉटर क्राफ्ट देण्यात आला आहे, परंतु सातत्याने सुरू असलेला पाऊस आणि त्यामुळे खवळलेला समुद्र यामुळे या रोबोटिक वॉटर क्राफ्टचे ट्रेनिंग पुढे पुढे ढकलावे लागत आहे. आता 7 ते 8 ऑक्टोबरला हे ट्रेनिंग होणार आहे. शुक्रवारी समुद्रात बुडालेल्या पर्यटकांना या रोबोटिक वॉटर क्राफ्टद्वारा वाचविता आले असते. मात्र त्यासाठीचे ट्रेनिंग अतिशय महत्त्वाचे असल्याने व ते झालेले नसल्याने हे वॉटर रोबोटिक क्राफ्ट वापरात आणण्यात आलेले नाही. भविष्यात तरी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी हे रोबोटिक वॉटर क्राफ्ट भूमिका बजावतील.?









