9 लाख लाभार्थ्यांची नोंद, उर्वरितांसाठी प्रक्रिया सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
महिलांसाठी महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गृहलक्ष्मी योजनेचा 7 लाख 61 हजार 549 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. 30 ऑगस्ट रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
सरकारने 5 गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. शक्ती, गृहज्योती, अन्नभाग्य योजनेपाठोपाठ गृहलक्ष्मी योजनेला प्रारंभ झाला आहे. याअंतर्गत दरमहा कुटुंब प्रमुख महिलेला दोन हजार रुपये दिले जात आहेत. जिल्ह्यात 11 लाख 87 हजार 469 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 10 लाख 6 हजार 580 लाभार्थ्यांची नोंद झाली आहे.
जुलै महिन्यात 9 लाख 78 हजार 155 लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 61 हजार 549 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित 2 लाख 16 हजार 606 लाभार्थ्यांना अद्याप रक्कम जमा झालेली नाही. मात्र ही प्रक्रिया सुरू असून येत्या एक-दोन दिवसांत उर्वरित लाभार्थ्यांची रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण खात्याने दिली आहे.
राज्य सरकारने 5 गॅरंटी योजनांमध्ये गृहलक्ष्मी योजनाही लागू केली आहे. याअंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी मागील महिन्याभरापासून अर्जनोंदणी सुरू होती. कर्नाटक वन, बेळगाव वन आणि बापुजी सेवाकेंद्रांवर ऑनलाईन अर्ज स्वीकृती सुरू होती. त्यानुसार आतापर्यंत 10 लाख लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिवाय अद्यापही नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.
टप्प्याटप्प्याने निधी थेट बँक खात्यात जमा होणार
30 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील 7 लाख लाभार्थ्यांना रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरितांसाठीदेखील प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 10 लाख लाभार्थ्यांनी नोंद केली आहे. सर्व लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने निधी थेट बँक खात्यात जमा केला जात आहे. मात्र काही लाभार्थ्यांची डीबीटी आणि इतर समस्या असल्याने अडचणी येत आहेत.
-नागराज आर. ( सहसंचालक, महिला व बालकल्याण खाते)









