मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघे : दोन वर्षीय मुलीचाही समावेश
वृत्तसंस्था/ रुद्रप्रयाग, देहराडून
उत्तराखंडमधील केदारनाथजवळील गौरीकुंड येथे रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये पायलटसह सर्व 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील एका 2 वर्षाच्या मुलीसह कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. हेलिकॉप्टर केदारनाथ मंदिरातून भाविकांना घेऊन गौरीकुंडला निघाले होते. प्राथमिक तपासात दमट व खराब हवामानामुळे दृश्यमानता चांगली नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे दिसून आले आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे होते. अपघातानंतर चारधाम यात्रा हेलिकॉप्टर सेवेवर बंदी घालण्यात आली आहे.
रुद्रप्रयागच्या गौरीकुंड भागात हेलिकॉप्टर अपघातस्थळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) पथक पोहोचल्यानंतर सर्व सात मृतदेह बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफ आणि स्थानिक पोलीसही बचावकार्यात सहभागी झाले होते. बचाव पथकाच्या म्हणण्यानुसार, कोसळल्यानंतर हेलिकॉप्टर आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ कमांडर अर्पण यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने एक बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. एसडीआरएफच्या पथकाने दुपारपर्यंत सर्व मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढले होते.
मृतांची ओळख पटली
गौरीकुंडजवळील जंगली भागात रविवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याने केदारनाथ धामहून गुप्तकाशीला जाणाऱ्या हेलिकॉप्टरमधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला. अपघातात जयपूरमधील पायलट कॅप्टन राजवीर सिंह चौहान, बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे (बीकेटीसी) कर्मचारी विक्रम रावत, उत्तर प्रदेशातील भाविक विनोद देवी, त्यांची नात तृष्टी सिंह आणि महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि मुलगी काशी जयस्वाल अशी मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटली आहे.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर रविवारी पहाटे 5:17 वाजता केदारनाथहून गुप्तकाशीसाठी रवाना झाले. उड्डाणानंतर काही वेळातच केदारनाथ खोऱ्यातील खराब हवामानामुळे ते दिशा भरकटले. याप्रसंगी परिसरातील हवामान खूपच खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर मार्ग चुकल्यानंतर कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रस्ता मार्गातही अडचणींचा सामना
जंगलछट्टीजवळील दरीत मातीचा ढिगारा आणि दगड पडल्यामुळे श्री बाबा केदारनाथ धामकडे जाणारा रस्ता खराब झाला आहे. यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर, सोनप्रयाग ते केदारनाथ धाम हा मार्ग पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. रस्ता खराब होण्यापूर्वी केदारनाथ धामला निघालेल्या भाविकांसह पायी प्रवास करणाऱ्यांसाठी प्रभावी सुरक्षा सुनिश्चित केली जात आहे.









