प्रतिनिधी / काणकोण
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या काणकोण शाखेने काणकोण तालुका पातळीवर आयोजित केलेल्या देशभक्तीपर गीतगायन स्पधेंत सादोळशे येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या गानवृंदाने प्रथम क्रमोक पटकावला. या स्पर्धेतील दुसरा क्रमांक किंदळे, पणसुले येथील श्री कात्यायणी बाणेश्वर विद्यालयाला आणि तिसरा क्रमांक चार रस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाला प्राप्त झाला.
देळे, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालयाच्या सभागृहात सदर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेस प्राचार्य डॉ. मनोज कामत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारंभाच्या व्यासपीठावर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुहास खांडेपारकर, पत्रकार अजित पैंगीणकर, ‘लोकमान्य’चे अधिकारी एमेलियो फुर्तादो, काणकोण शाखेचे व्यवस्थापक महेंद्र नाईक, आशुतोष केरकर उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके आणि स्मृतिचिन्हे देण्यात आली. डॉ. मनोज कामत आणि अजित पैंगीणकर यांनी लोकमान्य संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल कौतुक केले. सुहास खांडेपारकर यांनी स्वागत केले. सोनाली केंकरे यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कोमरपंत यांनी केले आणि त्यांनीच आभार मानले.









