सांगली :
शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेल्या निधीवर डल्ला मारून कोट्यवधीचा अपहार करणाऱ्या जिल्हा बँकेतील सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फे करण्यात आले. त्यांनी विविध शाखांमध्ये २ कोटी ११ लाख ६० हजार ८२४ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. अपहार प्रकरणी अजून १८ कर्मचाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरु आहे. त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.
बडतर्फ कर्मचाऱ्यांत इंद्रजित विठ्ठल वाघमारे (शाखा बसरगी), योगेश सुरेश वजरीनकर, प्रमोद सुरेश कुंभार (शाखा मार्केट यार्ड तासगाव), बाळासो नारायण सावंत (औ. वसाहत पलूस), प्रतिप गुलाब पवार, मच्छिंद्र गुंडा म्हारगुडे व दिंगबर पोपटी शिंदे (शाखा : नेलकरंजी) यांचा समावेश आहे.
नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना भरपाई, अनुदान स्वरुपात मदत दिली जाते. जिल्हा बँकेत आठ ते दहा वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांची सदर मदतीची कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. या रकमेत काही शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनीच अपहार केल्याच्या घटना वर्षभरात सातत्याने उघडकीस आल्या. हा अपहार चार ते पाच वर्षापूर्वी झाला आहे. मात्र बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सर्वच शाखांची अंतर्गत तपासणी मोहिम सुरु केल्याने हे घोटाळे उघडकीस आले.
शाखाधिकारी व लिपीक, काही ठिकाणी शिपाई यांनी संगनमताने शेतकऱ्यांच्या मदतीवर डल्ला मारला आहे. काही शाखांमध्ये बँकेच्या देणे व्याजातही अपहार झाल्याचे आढळले आहे. जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये शासकीय मदत, अनुदान व देणे व्याज यामध्ये ५ कोटी २२ लाख रुपयांचा अपहार आतापर्यंत उघडकीस आला आहे. बँकेने संबंधीत कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत २ कोटी ९० लाख रुपये वसूल केले आहेत. शासकीय अपहाराची सर्व रक्कम बँकेने शासनास परत केली आहे. अपहार करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.
यातील काहींवर फौजदारी दाखल केली आहे. या सर्वच घोटाळेबाज कर्मचाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरु आहे. या चौकशीचा अंतीम अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणार आहे. सात कर्मचाऱ्यांचा अहवाल बँकेस प्राप्त झाला असून त्यात कर्मचारी दोषी आढळले. या सात कर्मचाऱ्यांना बँकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
- शासन, नाबार्डकडून कारवाईचे कौतुक
याप्रकरणी अधिवेशनातही चौकशीची मागणी झाली. त्यानुसार सहकार विभागाने चौकशीचे आदेश दिले. मात्र जिल्हा बँकेने त्यापूर्वीच घोटाळेबाज कर्मचाऱ्याविरोधात कडक कारवाईचे पाऊल उचलले. सर्वच घोटाळेबाजांना निलंबीत केले. काहींवर फौजदारी तर काहींवर बडतर्फीची कारवाईही केली. याचे सहकार विभाग, नाबार्ड व चौकशी अधिकाऱ्यांनीही कौतुक केले आहे








