गणरायांना भक्तीभावाने निरोप : विसर्जनासाठी मलप्रभा नदीघाटावर गणेशभक्तांची गर्दी
खानापूर : खानापूर शहरास तालुक्यातील ग्रामीण भागात सातव्या दिवशी गौरी गणपतीला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. ’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर या’ अशा घोषणा देत बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. विशेषत: मंगळवारी सायंकाळी खानापूर शहरासह ग्रामीण भागातील विसर्जन ठिकाणी नदी, तलाव, विहिर परिसरात नागरिकांची गर्दी दिसून आली. येथील मलप्रभा नदीघाटावर रात्री उशिरापर्यंत घरगुती गौरी गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते.
दुपारी 4 नंतर शहरातील घरगुती गौरी गणेश विसर्जनास सुरुवात झाली. डोक्यावरुन तसेच चारचाकी वाहनातून आणि रिक्षातून गणपती मूर्ती नदीघाटावर आणण्यात येत होत्या. घाटावर गणेशाचे पूजन व आरती करून गणरायाला जड अंत:करणाने निरोप देण्यात येत होता. यावेळी महिला, लहान मुले आणि पुरुष मंडळी मोठ्या संख्येने विसर्जनासाठी सहभागी झाले होते. फटाक्यांच्या आतषबाजीत गणेशमूर्तेंचे विसर्जन करण्यात आले.
यापूर्वी दीड दिवसाच्या गणरायांना निरोप देण्यात आला आहे. त्यानंतर रविवारी पाचव्या दिवशी घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन मोठ्या प्रमाणात केले गेले. तर मंगळवारी सातव्या दिवशी सायंकाळी गौरी गणेशमूर्तीची विधिवत पूजा आणि आरती झाल्यानंतर कुटुंबीयांसह आबालवृद्धांनी भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात येत होते.









