वृत्तसंस्था/ ला नुसिया (स्पेन)
2022 च्या आयबीए युवा पुरुष आणि महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या सात मुष्टीयोद्धय़ांनी आपापल्या वजन गटात उपांत्य फेरी गाठत भारताची सात पदके निश्चित केली आहेत.
पुरुष विभागात विद्यमान आशियाई चॅम्पियन विश्वनाथ सुरेश, रविना, वंशज, भावना शर्मा, कुंजाराणी देवी थोंगम, लासू यादव, आशिष यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. 48 किलो वजन गटात भावना शर्मा, 60 किलो गटात कुंजाराणी देवी, 70 किलो गटात लासू यादव, 54 किलो गटात आशिष या भारताच्या महिला मुष्टीयोद्धय़ांनी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत प्रतिस्पर्ध्यावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवित शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. रविनाने रुमानियाच्या क्रेटूचा 63 किलो वजन गटात पराभव केला. भावनाने व्हेनेझुएलाच्या ब्रिटोचा, कुंजाराणी देवीने मेक्सिकोच्या झुजेट हेर्नांजेचा पराभव केला. 54 किलो गटात भारताच्या ग्रिविया देवीला कजाकस्तानच्या बेजारोव्हाकडून 0-5 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला.
पुरुषांच्या विभागात 48 किलो वजन गटात विश्वनाथने ऑस्ट्रेलियाच्या केरचा तर 63.5 किलो गटात वंशजने किर्जिस्तानच्या लिवाझाचा पराभव केला. आशिषने स्कॉटलंडच्या क्युलेनवर 4-3 असा निसटता विजय मिळवला. 75 किलो वजन गटात दीपक आणि 86 किलो गटात मोहित यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. या स्पर्धेमध्ये 73 देशांचे सुमारे 600 स्पर्धक सहभागी झाले आहेत. भारतीय स्पर्धकांनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केली असून सात जणांनी आणखी सात पदके निश्चित केली आहेत. या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढती बुधवारी तर अंतिम फेरीतील लढती शुक्रवार आणि शनिवारी होतील.









