प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील दहा ग्रामपंचायती आणि एक जिल्हा पंचायत यांच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत सात अर्ज दाखल झाले आहेत. येत्या दि. 23 रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे.
पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सुकूर (प्रभाग 10), कुडणे (प्रभाग 2), शेल्डे (प्रभाग 2), कुंडई (प्रभाग 7), केरी (प्रभाग 3), वळवई (प्रभाग 2), बोरी (प्रभाग 11), असोळणे (प्रभाग 1), राशोल (प्रभाग 5) आणि सुरावली (प्रभाग 2) यांचा समावेश आहे. तर जिल्हा पंचायतीमध्ये बाणावली मतदारसंघाचा समावेश आहे.
वरीलपैकी सुकूर 1, कुडणेसाठी 1, केरी 1, वळवई 2, असोळणे 1 आणि सुरावली 1 आदी मिळून 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित पंचायती आणि जिल्हा पंचायत यांच्यासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.
यापैकी बाणावली जिल्हा पंचायत मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आला असून तेथे पुऊष आणि महिला मिळून 20129 मतदार आहेत. या मतदारसंघात बाणावली, वार्का, ओर्ली, कासावली आणि कार्मोणा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सर्व पंचायती आणि जि. पं. साठी दि. 5 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून दि. 12 रोजी दुपारी 1 वाजता ही मुदत संपणार आहे. त्यानंतर दि. 13 रोजी अर्जांची छाननी होणार आहे. दि. 14 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतर लगेचच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. दि. 23 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान आणि दुसऱ्या दिवशी 24 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.