एकत: क्रतव: सर्वे सहस्त्रवरदक्षिणा
अन्यतो रोगभीतानां प्राणिनां प्राणरक्षणम्
अर्थ: सहस्रावधी दक्षिणा देऊन केलेले यज्ञकर्म आणि दु:खी, पीडित व्यक्तीची सेवा करणे हे सारखेच पुण्यप्रद आहे!
पालखीच्या सोहळ्याला सुरुवात झाली. प्रत्येक गावागावात प्रत्येक रस्त्यावरती दानधर्म करणाऱ्यांच्या मोठमोठ्या पाट्या लागल्या होत्या. कोणती पालखी कोठे थांबणार त्यांच्या जेवणाची व्यवस्था काय काय करायची? अन्नदान कोण करणार?अशा दात्याचं नाव असलेले मोठमोठे फलकही लागलेले होते. सर्व ठरल्याप्रमाणे चालू होते. हे सगळं पाहिल्यानंतर आपणही या सगळ्यात सहभागी व्हावं असं मनोमन वाटत होतं. पण कधीच देखावा न करणारे लोक यामध्ये फारसे रममाण होत नाहीत, तसंच माझं काहीसं झालं, पण राजकीय वृत्तीचे किंवा सतत दुसऱ्यांच्या चर्चेत राहणारे लोक मात्र या अशा प्रत्येक संधीचे फायदे घेताना आपल्याला दिसतात. हे सगळं बघत पालखीतील पादुकांचे दर्शन घेऊन, विचार करत केव्हा घरी पोहोचले ते माझं मलाच कळलं नाही. एवढ्यात संध्याकाळ झाली. माझ्या नातीने बागेत जाण्याचा हट्ट केला, बागेत जाताना तिला तिथे प्यायला पाणी, खाऊ अशा सगळ्या गोष्टी मी नेहमीच बरोबर घेत असते. तिथे गेल्यानंतर ती खेळता खेळता एखादे फळ खाते म्हणून फळही माझ्याबरोबर असतं. हे सगळं घेऊन मी बागेत गेले. तिने नेहमीप्रमाणे तिच्या पर्समधून पैसे देऊन तिकीट काढलं नंतर तिच्या आवडीच्या झोक्यावर जाऊन बसली. आज बागेत तशी बरीच गर्दी होती. तिचा झोका सुरू झाला. तिचं छान गाणं सुरू झालं.
एवढ्यात माझे लक्ष समोरच्या बेंचवर बसलेल्या एका गरीब मुलाकडे गेलं. त्याचे कपडे अगदी मळकट होते. रंगाने काळाढोण, केस विस्कटलेले, पायात चपला नाहीत अशा अवस्थेत एक छोटा मुलगा बसलेला होता. बरोबर कोणी दिसत नव्हतं. अगदी पाच सहा वर्षाचाच, त्याला बहुतेक झोक्यावर बसायचं होतं. एवढ्यात आमच्या शेजारचा झोका रिकामा झाला. मी त्याला हातानेच खुणावलं. येथे येऊन बस म्हटलं. त्याला खूप आनंद झाला. तो घाईघाईने उतरला आणि चालू लागला. चालताना मुलाच्या पायामध्ये दोष असावा असं जाणवलं. त्याला मी झोक्यावर बसायला मदत केली पण त्याला काही जोर देऊन झोका घेता येईना, मी एका हाताने माझ्या नातीचा झोका आणि दुसऱ्या हाताने त्या मुलाचा झोका झुलवायला सुरुवात केली. त्या मुलाच्या चेहऱ्यावरती जो काही आनंद झाला त्याला वर्णन करायला शब्दच नव्हते. त्याच्या त्या काळ्यासावळ्या चेहऱ्यावरती हसताना त्याचे पांढरे शुभ्र दात अगदी मोत्यासारखे दिसत होते. आणि त्याहीपेक्षा त्याच्या डोळ्यांमध्ये आलेली आनंदाची चमक मला खूप मोठे समाधान देऊन गेली. तो मुलगा आणि माझी नात अशी त्या दोघांची चढाओढ सुरू झाली. मी एका वेगळ्याच आनंदात तल्लीन झाले होते.
एका निरपेक्ष नात्याचा संस्कार सोहळाच सुरू झाला होता. खेळून झाल्यानंतर त्याला खाली उतरवलं, जवळ असलेला खाऊ दोन्ही मुठी भरतील एवढा दिला. त्याने बाकावर बसून लगेच खायला सुरुवात केली, माझी नातही त्याच्या शेजारी बसून मजेत खाऊ खात होती. त्यांची छोटीशी पंगत बागेत सुरु झाली. माझ्या मनातला भक्तिभाव पांडुरंगाच्या चरणी रुजू झाला होता. दोघांचे खाऊन झाल्यावर तो मुलगा बाहेर फुगे विकणारा माणूस बसलेला होता, त्याच्याजवळ जाऊन बसला.
झोळीतल्या बाळाला खेळवू लागला. अशा घटना आपल्या अवतीभवती अनेक घडत असतात. त्या फक्त तुम्ही सकारात्मकपणे घेतल्या तर खूप मोठा यज्ञ तुमच्याकडून पार पडत असतो. अशा यज्ञाचे कर्तेपण स्वीकारता आलं पाहिजे. असं कर्तेपण, असं कर्म निष्कामपणे अर्पण करण्याचा प्रयत्न केला तर गीता जगल्याचा आनंद आपल्याला जास्त मोठा मिळतो. असं जगणं सगळ्यांनाच जमलं तर जगात दु:खाचा लवलेशही राहणार नाही. पण अशा घटना अभावानेच वाट्याला येतात.








