पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण करीत असून त्यांच्या या वाढदिवसाचा अमृत महोत्सव ‘सेवा पंधरावडा’ म्हणून साजरा केला जाईल अशी माहिती भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असे 15 दिवस लोकउपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. काल सोमवारी पणजीतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दामू नाईक बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत सिद्धार्थ कुंकळकर आणि सर्वानंद भगत उपस्थित होते. गेल्या अकरा वर्षात एकही सुट्टी न घेता नियमितपणे पंतप्रधान मोदीनी जनसेवा केली आहे. आपल्या कार्याने जगभरात भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. आज अनेक देशातील लोक त्यांच्याकडे आदरपूर्वक नजरेने पाहतात. अशी व्यक्ती भारताला पंतप्रधान म्हणून लाभली हे आम्हा भारतीयांचे भाग्य आहे. आजच्या घडीला तरी मोदांशिवाय दुसरा पर्याय नाही, असे नाईक म्हणाले.
या पंधरावड्याच्या कालावधीत 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती साजरी होणार असून त्यादिवशी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नशा मुक्तीसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नमो पार्कची सुऊवात, मोदींचा प्रवास एक स्वयंमसेवक ते पंतप्रधान या काळाचा आढावा घेणारे माहितीपट दाखविले जाणार आहेत. एक पेड माँ के नाम ही मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विविध व्यक्तींवर जबाबदारी देण्यात आली असून त्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते आमदार, मंत्री, खासदार, पक्षाचे पदाधिकारी तसेच इतर सर्व लोकांचा सहभाग आहे, असेही ते म्हणाले. देशात भाजपाचे सरकार म्हणून आज गोव्याचाही भरभराटीने विकास झाला आहे. मोदींची कृपादृष्टी नेहमी गोव्यावर आहे. म्हणूनच गोव्याच्या विकासासाठी कोट्यावधी ऊपये ते मंजूर करतात. आज भाजप मोठा झाला तो चांगल्या आणि देशभक्तीच्या विचारसरणीमुळेच, भाजपाने नेहमी देशाला प्रधान्य दिले आहे. त्यामुळे आज मोठ्या संख्येने युवक भाजपाकडे वळत आहेत. आज भाजपाकडे 14 कोटी सदस्यांची नोंद असून त्यात 2 कोटी सक्रीय कार्यकर्ते आहेत, असेही नाईक म्हणाले.









