दि. 24 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत येत्या दि. 24 रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त ’सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ असा उद्देश ठेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आणि वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. भाजप गोवा प्रदेशातील मतदारसंघांच्या अध्यक्ष, सरचिटणीस, प्रभारी, पदाधिकारी यांच्या बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप उपाध्यक्ष बाबू कवळेकर आणि सरचिटणीस दामू नाईक यांचीही उपस्थिती होती. दि. 24 रोजी शिरगाव येथील श्रीलईराई देवीचा जत्रोत्सव आणि म्हापसा येथे श्रीमिलाग्र सायबिणीचे फेस्त साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्या दिवशी सर्वप्रथम शिरगाव मंदिरात जाऊन श्रीलईराई देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मयते अस्नोडा येथे सातार्डेकर यांच्या निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम होईल. तेथून ते म्हापसा येथे मिलाग्र सायबिणीचे दर्शन घेतील. त्यानंतर 10.30 वाजता मुख्यमंत्री साळगाव येथे पंचायत सभाग्रहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून राज्यातील पालिका आणि पंचायतींशी थेट संवाद साधतील. त्याचबरोबर स्थानिक लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतील. दुपारी 3 वाजता पणजीत मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित कौशल्य विकास कार्यक्रमात कौशल्य विकासावर पुस्तकाचे प्रकाशन, अभिनव विद्यापीठाशी करार, तसेच टाटा, एलअँडटी या कंपन्यांशी करारावर स्वाक्षऱ्या करतील. त्याशिवाय अनेक उमेदवारांना नोकरीची पत्रे वितरित करतील. सायंकाळी 4 वा. पणजीत भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून शुभेच्छा स्वीकारतील. रात्री 7.30 वाजता ते सांखळी येथे राधाकृष्ण मंदिरात आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावतील.
शतक महोत्सवी ’मन की बात’
येत्या दि. 30 रोजी महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ’मन की बात’ हा कार्यक्रम देशभरातून प्रसारित करण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम हा शतक महोत्सवी असल्यामुळे त्याला खास महत्व असून 100 टक्के लोकांना तो पाहता, ऐकता यावा यादृष्टीने देशभरात व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून गोव्यातही प्रत्येक बुथवर व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती तानावडे यांनी दिली.









