निवडणुकीच्या वातावरणात चोरट्यांची चलती : पंधरवड्यात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ : पोलीस दलासमोर तपासाचे आव्हानच
बेळगाव : गेल्या महिनाभरापासून पोलीस यंत्रणा विधानसभा निवडणूक बंदोबस्तात गुंतली आहे. याच संधीचा फायदा घेत बेळगाव शहर व तालुक्यात गुन्हेगार सक्रिय झाले असून चोऱ्या, घरफोड्या, लक्ष विचलित करून लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हानच उभे केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव परिसरात सध्या पोलीस दलाबरोबरच निमलष्करी दलाच्या जवानांचाही वावर आहे. रात्रीची गस्तही सुरू आहे. तरीही चोरट्यांनी पोलिसांना चकवून कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या पंधरवड्यातील स्थिती लक्षात घेता दहाहून अधिक चोऱ्या, घरफोड्या घडल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सेवा बजावणाऱ्या बहुतेक जुन्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळापुरते नवे अधिकारी बेळगावला आले आहेत. बेळगावचे गल्लीबोळ किती आहेत, याची माहिती जाणून घेईपर्यंत निवडणूक प्रक्रिया संपते व ते पुन्हा आपल्या पूर्वीच्या पदावर निघून जातात. याच परिस्थितीचा फायदा गुन्हेगार घेत असल्याचे आढळले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. रात्रीचा उकाडा सहन न झाल्यामुळे अनेकजण खिडक्या, दरवाजे उघडे ठेवून झोपतात. या संधीचाही चोरटे फायदा उठवत आहेत. जत्रा, यात्रा व सुटीसाठी आपल्या घराला कुलूप लावून परगावी जाणाऱ्या नागरिकांनाही आम्ही घरी परत येईपर्यंत सर्व काही सुखरूप असेल, याची शाश्वती नाही. बंद घरांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. गेल्या पंधरवड्यातील काही घटना लक्षात घेता स्थानिक गुन्हेगारांबरोबरच आंतरराज्य गुन्हेगारांचाही बेळगाव परिसरात वावर असल्याचा संशय बळावतो आहे. 26 एप्रिल रोजी भरदुपारी राधाकृष्ण मार्ग, हिंदवाडी येथे रस्त्यावर पैसे पडल्याचे सांगत एका वृद्ध पिग्मी कलेक्टरचे लक्ष विचलित करून त्याच्याजवळील 1 लाख 25 हजार रुपये असलेली बॅग पळविली. टिळकवाडी पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप गुन्हेगारांचा सुगावा लागला नाही.
28 एप्रिल रोजी खडेबाजार पोलीस स्थानकात विवेकानंद गुरव, रा. गोंधळी गल्ली या विद्यार्थ्याने खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 18 एप्रिल रोजी मध्यरात्री हा विद्यार्थी रहात असलेल्या खोलीतून 56 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरण्यात आला आहे. त्यानंतर 29 एप्रिल रोजी दुर्गा कॉलनी, होनगा येथे दोन बंद घरांचा कडीकोयंडा तोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. 2 मे रोजी रात्री 8 ते 9 या वेळेत खाऊ कट्ट्याजवळ उभ्या केलेल्या एका कारची काच फोडून 20 तोळ्यांचे सोन्याचे दागिने भामट्यांनी लांबविले आहेत. मुधोळ येथील डॉ. गिरीश व त्यांचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियाला लग्नाला जाण्यासाठी बेळगावला आले होते. बेळगावहून रेल्वेने ते बेंगळूरला जाणार होते. बेंगळूरहून विमानाने ऑस्ट्रेलियाला जाण्याचा त्यांचा बेत होता. केवळ तासाभरात कारची काच फोडून गजबजलेल्या परिसरात 20 तोळ्यांचे दागिने लांबविल्याची घटना घडूनही अद्याप गुन्हेगारांचा थांगपत्ता लागला नाही. बस्तवाडजवळील एका कार शोरुमच्या डिलिव्हरी डोअरचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कॅश काऊंटरमधून 57 हजार 170 रुपये रोकड पळविली आहे. 6 मे रोजी ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेच्या एक दिवस आधी शुक्रवार दि. 5 मे रोजी सोमनाथनगर, हिंडलगा येथील मलिक किल्लेदार यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 4 लाख रुपये किमतीचे 80 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक घड्याळ लांबविण्यात आले आहे.
पोलीस यंत्रणेला दक्ष बनविण्याची गरज
बेळगाव ग्रामीण, हिरेबागेवाडी, खडेबाजार, टिळकवाडी, काकती पोलीस स्थानकात या घटनांची नोंद झाली आहे. वरील घटना केवळ उदाहरणे आहेत. अशा आणखी अनेक घटना बेळगाव परिसरात घडल्या आहेत. गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावणे तर दूरच, माध्यमांना या घटनांची माहिती मिळू नये, याची काळजी घेण्यातच पोलीस यंत्रणा धन्यता मानत आहे. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले असून पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी यंत्रणेला दक्ष बनविण्याची गरज आहे.









