वृद्ध महिला, मॉर्निंग वॉकर्समध्ये भीतीचे वातावरण
बेळगाव : भारतनगर, शहापूर येथील क्रॉस क्रमांक 4, 5, 6 परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या परिसरातील लहान मुले, कोंबड्या तसेच इतर प्राण्यांवर देखील सदर कुत्री हल्ला करत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. कुत्र्यांचा कळप या ठिकाणी ठाण मांडून असतो. पहाटे किंवा रात्रीच्यावेळी अचानक ही कुत्री हल्ला करत आहेत. या परिसरात अनेक कोंबड्या पाळल्या आहेत. त्या कोंबड्या फिरत असताना अचानकपणे ही कुत्री हल्ला करत आहेत. त्यामुळे फटका बसत आहे. याचबरोबर इतर प्राण्यांवरही हल्ला करून जखमी करत आहेत. तेव्हा या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. माजी नगरसेवक दिनेश रावळ यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना याबाबत अनेकवेळा सूचना केल्याचे सांगितले. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पहाटे वृद्ध महिला तसेच नागरिक मॉर्निंग वॉकला जात असतात. त्यावेळीही ही कुत्री अचानकपणे हल्ला करत आहेत. तेव्हा महानगरपालिकेने या परिसरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ड्रेनेजची समस्याही गंभीर
भारतनगर चौथा व सहावा क्रॉस परिसरात ड्रेनेजची समस्या नेहमीचीच आहे. ड्रेनेजचे चेंबर ब्लॉक होवून अनेक विहिरींना ड्रेनेजचे दूषित पाणी मिसळत आहे. त्यामुळे या परिसरात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. असलेल्या विहिरींचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. तेव्हा ड्रेनेजची समस्याही दूर करावी, अशी मागणी होत आहे.









