प्रतिनिधी/ पणजी
राष्ट्रीय हवामान बदल मोहिमेसाठी धोरणात्मक ज्ञान अंतर्गत तीन स्वदेशी स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित केली आहेत. हवामान लवचिकता मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. सरकारने गोवा बिटस् पिलानीच्या सहकार्याने विकसित केलेली ही केंद्रे गोवा राज्य जैवविविधता मंडळ, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सचिवालय येथे आहेत. सध्या ही केंद्रे रिअल-टाइम डेटा प्रमाणीकरणातून जात आहेत.
ही केंद्रे ‘हवामान बदल राज्य कृती आराखडा’ अंतर्गत व्यापक प्रयत्नांचा भाग आहेत. त्यात गावपातळीवर भेद्यता आणि हवामान प्रभाव मूल्यांकन यांचा समावेश आहे. हे मूल्यांकन हवामान-संवेदनशील क्षेत्रे ओळखण्यास आणि अनुकूल धोरणांची माहिती देण्यास मदत करणारे आहे. त्याची माहिती गोवा हवामान बदल कक्षाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
यासंदर्भात अद्याप नाबार्ड, आयसीएआर किंवा इस्रो सारख्या राष्ट्रीय संस्थांसोबत कोणतेही औपचारिक सामंजस्य करार झालेले नसले तरी, राज्य व्यापक सार्वजनिक पोहोच उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि किनारी जैवविविधता व्यवस्थापन समित्या आदींसोबत बैठका यांचा समावेश आहे. त्याद्वारे जागरूकता वाढवणे आणि स्थानिक पातळीवर हवामान कृती उपाययोजनांच्या अंमलबजावणीला पाठिंबा देणे हा उद्देश आहे. हा उपक्रम रिअल-टाइम डेटा, तळागाळातील सहभाग आणि वैज्ञानिक सहकार्यावर आधारित एक मजबूत हवामान प्रशासन चौकट तयार करण्यासंबंधी महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे.









