आमदार अनिल बाबर यांची माहिती
विटा प्रतिनिधी
सांगली येथे कीटकनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी राज्य शासनाने १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे द्राक्ष, डाळींब यासह निर्यातक्षम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची सोय होणार आहे. शिवाय इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही सांगली येथे शेतमाल तपासणीची सोय होईल, अशी माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किटकनाशक उर्वरित अंशविरहित शेतमालाला मोठ्या प – माणात मागणी असते. युरोपीय देशात द्राक्ष, डाळींब यासारख्या फळांची निर्यात करण्यासाठी कीटकनाशकांचा अंश तपासणी प्रमाणपत्र सक्तीचे आहे. म्हणून शासनानेही कीटनाशक उर्वरित अंश तपासणीची सक्ती केली आहे. यासाठी कीटकनाशक अंश तपासणीच्या शासकीय प्रयोगशाळा पुणे आणि नागपूर येथेच आहेत, पण तेथील तपासणी खर्चिक असल्यामुळे शेतकयांना परवडत नाही. या तपासणीसाठी सांगली जिल्ह्यात प्रयोगशाला नसलेने भागातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. तपासणीचा अहवाल यायला वेळ लागत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे नाहक मानसिक आणि अर्थिक त्रास सहन करावा लागत होता.
आमदार अनिल बाबर यांनी सांगलीत शेतमाल तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी सरकारकडे मागणी केलेली होती. या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी राज्य शासनाने सांगली आणि नाशिक जिल्ह्यासाठी सदर कीटकनाशक अंश तपासणी प्रयोगशाळा मंजूर केल्या आहेत. प्रत्येक प्रयोगशाळेसाठी १७ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. सांगली येथील प्रयोगशाळेचा लाभ सांगलीसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील शेतकऱ्यांना होणार आहे.
प्रयोगशाळा उभारणीमुळे निर्यातक्षम शेतमालाची तपासणी सांगलीत शक्य होणार आहे. औषधांचा अंश आहे किंवा नाही याचे प्रमाणपत्र सांगलीतूनच उपलब्ध होणार आहे. नाशिक आणि सांगलीतील द्राक्ष उत्पादने लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे.