हॉटेलचालकांडे मागितले दरमहा पाच लाख : राजकारण्याच्या नावाने ‘युगेश’चा कारनामा
म्हापसा : उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातील आलिशान हॉटेलचालकांकडून प्रत्येक महिन्याला पाच लाख रुपये खंडणी वसूल करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या ‘युगेश’ नामक व्यक्तीकडून ही खंडणीची मागणी झाली असून त्याला काही पोलीस अधिकारी तसेच राजकारण्यांचेही अभय असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही खंडणी आपणास बड्या राजकारण्यापर्यंत पोहोचवायची आहे, असे या ‘युगेश’ने हॉटेलचालकांना खास बोलावून घेऊन सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांच्या नावानेही त्याने वेगळे पाच लाख रुपये मागितल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे या खंडणीमागे नेमके कोण, कोण आहेत, हे पाहण्यासाठी या प्रकरणाची कसून चौकशी होण्याची गरज आहे.
‘रंगधूम’मध्ये खंडणीचे ‘सेटिंग’
युगेशने रंगपंचमीचे निमित्त साधून कळंगुट येथे ‘रंगधूम’ पार्टीचे आयोजन केले होते. त्या दिवशी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही पार्टी सुरु होती. सगळ्यांची बडदास्त ठेवण्यात आली होती. राजकारणी, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व अन्य सेलेब्रिटी व्यक्ती त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याचवेळी या खंडणीचे ‘सेंटिंग’ झाले, अशी माहिती उघड झाली आहे.
दरमहिना पाच लाख द्यावे
उत्तर गोव्यातील किनारपट्टीतील अनेक हॉटेलचालक या पार्टीला आले होते. त्यांच्यावर 200 सीसी टीव्ही कॅमेरांद्वारे करडी नजर ठेवण्यात आली होती. त्यांचे मोबाईल बंद करण्याची सक्ती केली होती. सर्व हॉटेलचालकांनी दर महिन्याला आपल्याकडे पाच लाख रुपये द्यावे, असे फर्मान या युगेशने सोडले. मात्र उपस्थित राहिलेल्या अनेक हॉटेलचालकांनी या साऱ्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत पार्टी अर्धवट सोडून गेले होते. युगेशचे राजकीय लोकांशी चांगले संबंध असल्याने पोलीसही त्याच्या विरोधात कारवाई करायला घाबरतात, अशीही माहिती मिळाली आहे.









