कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष खर्गेंचा सल्ला : आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज असल्याचाही दावा
वृत्तसंस्था/ हैदराबाद
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज असून आपला विजय निश्चित असल्याचा दावा करत रविवारी कॉग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीचा समारोप करण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीत वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवण्याचा सल्ला देत पक्षाच्या यशाला प्राधान्य देण्यास सांगितले. पक्षशिस्त आणि ऐक्मयाचे आवाहनही त्यांनी केले. देशात परिवर्तनाची चिन्हे असून हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका त्याचा पुरावा असल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.
काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक गेले दोन दिवस हैदराबाद येथे पार पडली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस छत्तीसगड, मध्यप्रदेश, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये लवकरच निर्णायक जनादेश मिळवेल, असा विश्वास व्यक्त करून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आटोपती घेण्यात आली. तसेच, एप्रिल-मे 2024 मध्ये प्रस्तावित असलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटनेची तयारी पूर्ण झाली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, पी चिदंबरम, अंबिका सोनी, सलमान खुर्शीद, आनंद शर्मा यांच्यासह इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय सीडब्ल्यूसी बैठक पार पडली.
एक देश, एक निवडणूक या मुद्यावरून काँग्रेस अध्यक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या लोकांनी तयार राहावे, असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाला 100 वर्षे पूर्ण होत असताना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे हे आमचे ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन खर्गे यांनी केले. 2024 मध्ये भाजपला सत्तेतून काढून टाकणे हीच महात्मा गांधींना सर्वात योग्य श्र्रद्धांजली असेल. आता आपली बेफिकीर राहण्याची वेळ नाही. गेल्या दहा वर्षांत भाजपच्या राजवटीत सर्वसामान्यांसमोरील आव्हाने दुपटीने वाढली आहेत. केंद्रातील हुकूमशाही सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी सर्व शक्ती वापरावी लागेल, असे ते म्हणाले. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील पक्षाच्या विजयावरही त्यांनी प्रकाश टाकताना जनता पर्यायाच्या शोधात असून दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत आमचा विजय हा त्याचा स्पष्ट पुरावा आहे, असेही खर्गे यांनी सांगितले.
अथक परिश्र्रम आवश्यक
वैयक्तिक हित बाजूला ठेवून आपण अथक प्रयत्न केले पाहिजेत. आपण वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून पक्षाच्या यशाला प्राधान्य दिले पाहिजे. आपण आत्मसंयम बाळगला पाहिजे आणि आपल्या नेत्यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्ये करणे टाळले पाहिजे. पक्षाचे हित जपताना कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी आपल्याला नजिकच्या काळात घ्यावी लागेल, असेही खर्गे यांनी सांगितले.
विविध ठराव मंजूर
शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाने वादग्रस्त मुद्यांपासून दूर राहायचे आणि त्यात अडकायचे नाही, असे ठरवले होते. सनातन धर्माबाबत सुरू असलेल्या वादाच्या ऐवजी गरीब आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावे, असे बैठकीत सांगण्यात आले. तसेच या बैठकीत केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव, मणिपूरवरील शोक प्रस्ताव आणि हिमाचल प्रदेशातील आपत्तीबद्दल शोक ठराव मंजूर करण्यात आला. पक्षाने हिमाचल प्रदेशातील आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे.
एक देश, एक निवडणूक हा राज्यघटनेवर हल्ला आहे आणि पक्ष ते मान्य करणार नाही, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी काँग्रेसच्या बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना स्पष्ट केले. चिदंबरम यांनी हा संघवादावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या कामकाजात अडथळा आणत असून राज्यांना महसुलात वाटा नाकारला जात आहे किंवा त्यांचा वाटा कमी करण्यात आला आहे, असा आरोपही त्यांनी केला.









