कराड :
कराड व मलकापूर परिसरात गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे कोल्हापूर नाक्यावरील सेवारस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून यामुळे रस्ता खचून अपघाताचा संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित कंपनीने प्रशासन आणि वाहतूक शाखेला कोणतीही पूर्वसूचना न देता हे काम सुरू केल्याने सोमवारी वाहतूक विभाग आणि गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
कराड ते मलकापूर सेवारस्त्यावर सीएट टायर शोरूमसमोरील सेवारस्त्यावर अवाजवी खोदकाम करण्यात आले असून त्या ठिकाणी रस्त्याचा मोठा भाग खचल्याचे दिसत आहे. ५२.४६ फूट लांबीचा अन् १९.६९ रूंदीचा रस्ता खोदला आहे. या रस्त्याचा वापर स्थानिकांसह महामार्गावरील वाहनधारक मोठ्या प्रमाणावर करतात. नव्या उड्डाणपुलाच्या कामामुळे आधीच वाहतूक वळवण्यात आली असताना अशा पद्धतीने पुर्वसूचना न देता खोदकाम केल्याने वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढल्याचे सांगत वाहतूक पोलीस अधिकारी संतप्त झाले.
या प्रकरणी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी, हवालदार सोनम पाटील व विष्णू मर्देकर यांनी घटनास्थळी भेट देऊन खोदकाम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारला. पूर्वसूचना किंवा पत्र न देता तुम्ही थेट काम सुरू करता यामुळे वाहतूक विस्कळीत होते अपघात घडू शकतात. किमान पत्र पाठवले असते तर वाहतूक नियोजन करता आले असते असे सुनावले.
पोलिसांच्या मते, संबंधित कंपनीने गॅस पाईपलाईनचे काम डुबल पेट्रोल पंपासमोर वळणमार्ग असलेल्या ठिकाणी न करता पुढे वळण नसलेल्या जागी सुरू केले. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा खड्डा पडून सेवारस्त्याचा काही भाग खचला असून नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यालाही धोका होण्याची शक्यता सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सुर्यवंशी यांनी व्यक्त केली. या कामामुळे शहरात वाहतूक कोंडी होत असून वाहनधारकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून जर काही अनुचित घडलं, तर जबाबदार कोण? असा थेट सवाल सूर्यवंशी यांनी केला. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कामाचे स्वरूप समजावून सांगितले. मात्र पोलिसांनी अशा पत्र न देता सुरू केलेल्या कामावर आक्षेप घेत यापुढे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी लेखी पत्राद्वारे सूचना द्यावी अशी सुचना केली.
- वाहनधारकांना त्रास न देता काम पूर्ण करू
गॅसपाईलाईनचे काम सुरू असलेल्या ठिकाणी निरीक्षण करणारे अधिकारी संजय ठाकूर म्हणाले, गॅसपाईपलाईनचे काम करताना मोठ्या प्रमाणात खोदकाम करावे लागते. आम्ही पुरेशी सुरक्षायंत्रणा राबवून हे काम करत आहोत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्यांना आज पत्र देत आहोत. कोणतेही काम करताना नॅशनल हायवे ऑथिरिटीसह अदानी, जैन कंपनीलाही कळवले जाते. यापुढही समन्वय ठेवून काम पूर्ण केले जाईल. नागरिकांच्या दृष्टीने कोणालाही त्रास न होता किंवा दुर्घटना न घडण्याची काळजी आम्ही घेत आहोत.
- रिफ्लेक्टर, सूचना फलक लावा
गॅसपाईपलाईनचे काम नागरिकांच्या दृष्टीने वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे, त्या बद्दल आमचे काहीही मत नाही. परंतू नव्या उड्डाणपुलाच्या कामामुळे सेवारस्त्यावर वाहतुकीचा भार आहे. खोदकाम करताना रिफ्लेक्टर, सूचना फलक वॉर्डन नेमणे आवश्यक असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीय सूर्यवंशी यांनी सांगितले.








