प्रवाशांनी हात दाखवूनही जत आगाराची बस थांबली नाही
सांगली : “बाट पाहिन पण एसटीनेच जाईन” या घोषवाक्याचा बोजवारा उडाल्याचे ज्वलंत उदाहरण मंगळवारी संध्याकाळी पुष्पराज चौकात पाहायला मिळाले. प्रवाशांनी हात दाखवूनही जत आगाराची बस थांबली नाही. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी‘ असे सांगणाऱ्या लालपरीने प्रवाशांना रस्त्यावर उभे ठेवले!
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जत आगाराची बस सांगलीवरून निघाली होती. पुष्पराज चौक येथे महिला प्रवासी आणि इतर नागरिकांनी हात दाखवला, पण चालकाने न थांबता बस वेगाने पुढे नेली. त्या प्रवाशांच्या चेह्रयावरचा अपमान, संताप आणि असहायता स्पष्ट दिसत होती. एसटी ही सामान्य माणसाची ओळख, जनतेच्या विश्वासाचे प्रतीक. पण आज काही मनमानीमुळे एसटीची ‘सेवा‘ नव्हे, ‘मनमानी परिवहन‘ अशी नवी ओळख निर्माण होत आहे.
फक्त आगार रंगवून, बोर्ड लावून आणि ‘महिला सन्मान योजना‘ची जाहिरात करून काय उपयोग, जर महिलांनाच बस थांबवून दिली जात नसेल तर? व अशा घटना घडूनही अधिकारी गप्प बसत तर असतील ‘लालपरी‘ बरचा विश्वास गमावण्याची वेळ दूर नाही. अर्ध्या तिकिटाची सवलत नको, पण माणूस म्हणून वागवा, अशा प्रवाशांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत
राज्य परिवहन महामंडळाने अमृत महोत्सवी वर्षात ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के सवलत देऊन जनतेचे मन जिंकले. पण मैदानात ही सेवा कोसळतेय! महामंडळाने अशा निष्काळजी कठोर कारवाई करून प्रवाशांचासन्मान जपावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जत आगारात शिस्त लागणार का?
जत आगारातील काही चालकांचा अहंकारच आता प्रवाशांना धडा शिकवतोय का, असा प्रश्र उपस्थित होत आहे. बस थांबवणे म्हणजे उपकार नाही, ती प्रवाशाची हक्काची सेवा आहे. महामंडळाने तात्काळ समज देऊन शिस्त लावली नाही तर प्रबासीच ‘लालपरी‘कडे पाठ फिरवतील, हे प्रशासनाने लक्षात ठेवावे.









