नागरिकांना माघारी फिरावे लागतेय : आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : महापालिकेच्या कोनवाळ गल्ली येथील विभागीय कार्यालयामध्ये सर्व्हरडाऊन झाले आहे. त्यामुळे ई-आस्थीसह इतर कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोनवाळ गल्लीतील मनपाच्या कार्यालयाबाबत नागरिकांतून तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे याकडे मनपा आयुक्तांनी लक्ष देऊन कामकाजात सुधारणा करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करावी, अशी मागणी केली जात आहे.
सध्या सर्वच शासकीय कार्यालयांचे कामकाज पेपरलेस झाले असून ऑनलाईन पद्धतीने काम सुरू आहे. जन्म-मृत्यू दाखले, ई-आस्थी, घरपट्टी, घरचे उतारे ऑनलाईन पद्धतीनेच दिले जात आहेत. मात्र, शासकीय कार्यालयातील सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. कोनवाळ गल्लीत वारंवार मनपाचे सर्व्हरडाऊन होत आहे. त्यामुळे नागरिकांना कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे.
बुधवारी सर्व्हर नसल्याने कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी गप्प बसून होते. याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता सर्व्हरडाऊन असल्याचे सांगितले जात होते. याबाबतची माहिती बीएसएनएलला देण्यात आली असून सर्व्हर समस्या पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले. वारंवार या ना त्या कारणावरून कोनवाळ गल्लीतील मनपाचे विभागीय कार्यालय चर्चेत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.









