कोल्हापूर :
रुक्मिणीनगर येथील कॉस्मेटीक विक्रीच्या कार्यालयात 29 मार्च रोजी घडलेल्या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले. बनावट चावीच्या सहाय्याने 10 वर्षापूर्वी काम करणाऱ्या नोकरानेच मालकाच्या 10 लाख रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संशयित गोविंदप्रसाद भवरलाल नायक (वय 23, रा. वीर छापरागाव, राजस्थान) याला गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथून अटक केली. त्याच्याकडून 9 लाख 80 हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राजू राम केसरी (रा. कारंडे मळा) यांचा कॉस्मोटिक साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे रुक्मिणीनगर येथे कार्यालया असून, या ठिकाणी त्यांचे कर्मचारी राहतात. शनिवार (29 मार्च) रोजी त्यांच्या कार्यालयातून 9 लाख 80 हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी केसरी यांना दिल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक या घटनेचा समांतर तपास करत होते. पोलीस अंमलदार शुभम संकपाळ व विशाल चौगुले यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता चोरटा दिसून आला. घटनास्थळापासून महामार्गापर्यंत त्याने केलेल्या प्रवासाचे 27 फुटेज या पोलिसांनी पाहिले. यामध्ये चोरटा कैद झाला होता. या फुटेजमधील संशयिताबाबत फिर्यादीकडे चौकशी केल्यानंतर तो 10 वर्षापूर्वी केसरी यांच्याकडे काम करत असल्याचे समोर आले आहे. चोरटा गोविंदप्रसाद हा रूक्मिणीनगरातून पायी महामार्गाकडे गेला. तिथून मिळेल त्या वाहनांची मदत घेत त्याने पुणे गाठले. पुण्यातून त्याने विमानाने दिल्ली येथे गेल्याची माहिती तपासात समोर आली. दिल्लीतून गाझियाबादमध्ये येथे जाऊन तो लपून बसला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गाझियाबाद येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, शहर उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे, विजय इंगळे, सचिन पाटील, सागर माने, लखन पाटील, महेश खोत, गजानन गुरव यांनी तपासात सहभाग घेतला.
- चोरी पूर्वी केली रेकी
चोरी करण्यापूर्वी गोविंदप्रसाद हा दिल्ली येथील एका खासगी ठिकाणी काम करत होता. 26 मार्च रोजी तो रात्री कोल्हापुरात आला. यानंतर त्याने केसरी यांच्या रुक्मिणीनगर येथील कार्यालयाची रेकी 27 मार्च रोजी केली. यावेळी त्याने अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलल्याचेही समोर आले.
- बनावट चावी आणि दोरखंडाचा वापर
चोरी करताना चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले नव्हते. गोविंदप्रसाद याने डुप्लीकेट चावीचा वापर करत फ्लॅटमध्ये आत प्रवेश केल्याचा संशय पोलिसांना होता. चोरी करुन जाताना आतील बाजूने मुख्य दरवाजाला कडी लावण्यात आली होती. जाताना दुसऱ्या मजल्यावरुन उतरण्यासाठी दोरखंडाचा वापर केला होता.








