विजेअभावी गेले दहा दिवस पाणीपुरवठा बंद : ग्रामस्थांवर पावसाचे पाणी वापरण्याची वेळ : हेस्कॉमचा बेजबाबदारपणा उघड
वार्ताहर /कणकुंबी
कणकुंबी-पारवाड गावात गेले दहा दिवस पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी विजेअभावी बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने खानापूर हेस्कॉम खात्याच्या बेजबाबदारपणाचा कळस झाला आहे. कणकुंबी आणि परिसरातील जवळपास पंधरा-वीस खेडी गेले दहा ते बारा दिवस अंधारात असून खानापूर हेस्कॉमला विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे कणकुंबी, पारवाड व इतर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पावसाचे पाणी किंवा नाल्यातील पाणी वापरावे लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी विजेअभावी बंदच आहेत. त्यामुळे गेले दहा दिवस नळपाणी योजना कूचकामी ठरली आहे. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने लोकांना पावसाचे पाणी प्यावे लागत आहे. हवामानात अचानक बदल झाल्याने नागरिक आजारी पडल्यास हेस्कॉमला जबाबदार धरावे की आरोग्य खात्याला, असा दुहेरी प्रश्न निर्माण झाला आहे.
कणकुंबी भागात विद्युत पुरवठाच नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दिवसभर काबाडकष्ट करून येणाऱ्या शेतकऱ्यांना घरात रात्री अंधाराला सामोरे जावे लागत आहे. वीज नसल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे विशेषत: महिला वर्ग वैतागून गेला आहे. पूर्वी रेशन दुकानामार्फत रॉकेल पुरवठा केला जात होता. परंतु आता रॉकेलही बंद असल्याने घरात दिवासुद्धा पेटवता येत नाही. विजेअभावी कणकुंबी भागातील नागरिकांचे जीवन अंधकारमय झाले आहे. आजच्या या स्पर्धात्मक तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दहा-बारा दिवस नागरिकांना अंधारात राहावे लागत असल्याने कर्नाटक सरकारच्या कारभाराला जनता वैतागली आहे. शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने कणकुंबी भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास सरकार अपयशी ठरले आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच वाहतूक, आरोग्य, विद्युत अशा मूलभूत गरजांसाठी नागरिकांना आजही संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष पसरला आहे.
जनरेटद्वारे पाणीपुरवठा
कणकुंबी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी समस्या गंभीर बनली आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी पारवाड ग्रा. पं. ने जनरेटरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र खर्च परवडत नसल्याने नागरिकांना विश्वासात घेऊन दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांपासून या भागाचा विद्युतपुरवठा सुरळीत नाही. दोन महिन्याप्ंाtर्वी कणकुंबी भागातील महिलांनी हेस्कॉम कार्यालयाला घागरी मोर्चा काढला होता. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विद्युतपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देवून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र आजतागायत कणकुंबी भागातील 40 खेड्यांचा विद्युतपुरवठा आजही खंडितच आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.









