वॉशिंग्टन-अमेरिका/ वृत्तसंस्था
भारताचा यू-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदला अमेरिकेतील मायनर लीग क्रिकेट स्पर्धेदरम्यान डोळय़ाची दुखापत झाली. ‘आणखी गंभीर दुखापत होऊ शकली असती. पण, ती टळली आणि याबद्दल मी दैवाचा आभारी आहे’, असे ट्वीट त्याने केले. तो या स्पर्धेत सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्स संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. अमेरिकेतर्फे खेळण्यासाठी उन्मुक्त चंदने गतवर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स या तीन आयपीएल प्रँचायझींचे प्रतिनिधीत्व केले. शिवाय, बिग बॅश लीगमध्ये करारबद्ध होणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.









