देशात तसेच रशिया आणि युपेनमध्ये शांततेसाठी केली प्रार्थना
बेळगाव ः बेळगाव शहरातील आणि परिसरातील सर्व चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर मृत्यूचा दिवस अर्थात गुड फ्रायडेनिमित्त प्रार्थना, उपासना गांभीर्याने आचरण्यात आली.
शुक्रवारी सकाळी सर्व चर्चमधील ‘वे ऑफ द क्रॉस’ प्रार्थनेत ख्रिश्चन बांधवांनी भाग घेतला. सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये फादर जोसेफ कॅस्टेलिनो यांच्या नेतृत्वाखाली, इमॅक्मयुलेट कन्सेप्शन चर्चमध्ये लाईव्ह वे ऑफ द क्रॉस सादर करण्यात आला. वधस्तंभावर खिळण्यापूर्वी येशू ख्रिस्तांनी अनुभवलेल्या वेदना आणि यातना अनुभवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला.
दुपारनंतर धार्मिक सेवा करण्यात आली आणि क्रॉसवरील मृत्यूपूर्वी येशू ख्रिस्तांनी सहन केलेल्या यातनांचे कथन करण्यात आले. यावेळी ख्रिश्चनांनी देशभरात सांप्रदायिक सलोखा आणि शांततेसाठी प्रार्थना केली. तसेच रशिया आणि युपेनमध्ये शांततेसाठी प्रार्थना केली.
आपल्या गुड फ्रायडे संदेशात, बेळगावचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी लोकांना येशू ख्रिस्तांच्या शिकवणींचे पालन करण्याचे आवाहन केले. क्षमा, शांतता आणि सलोखा या शिकवणींचे पालन करण्याचे आवाहन केले.









