युरोपियन देशांनी टप्प्याटप्प्याने रशियाकडून केली जाणारी नैसर्गिक वायूची खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाने या निर्णयाला गंभीर आक्षेप घेतला असून या निर्णयाचे क्रियान्वयन केल्यास युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल अशी शक्यता बोलून दाखविली आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी हा निर्णय पश्चिम युरोपियन देशांच्या अंगलट येईल असा इशारा दिला आहे. अशी धोरणे ठरविणाऱया व्यक्ती युरोपला आर्थिक खाईत लोटत आहेत. त्यांना रशियाच्या सामर्थ्याची कल्पना आलेली नाही. आमच्या वाजवी दरातील वायूमुळे युरोपातील अनेक कारखाने आणि उत्पादन केंद्रे सुरु आहेत. आमच्या विरोधात सूडबुद्धीची कारवाई केल्यास रशिया युरोपियन देशांची कोंडी करु शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही पुतीन यांनी दिला. रशिया प्रतिदिन युरोपला लक्षावधी युनिट्स्चा वायुपुरवठा करतो. हा वायू युक्रेनमधून जाणाऱया एका पाईपलाईनद्वारे केला जातो. या युद्धात या पाईपलाईनला अद्यापही हात लागलेला नाही. त्यामुळे युरोपाचा गॅस पुरवठा अबाधित राहिला आहे. मात्र पुतीन यांनी त्यांचा इशारा आचरणात उतरविल्यास युरोपियन देशांची अडचण होऊ शकते. दुसऱया देशाकडून नैसर्गिक वायू घेणे युरोपातील अनेक देशांना आर्थिक दृष्टय़ा परवडण्यासारखे नाही असे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले.









