प्रतापगड :
महाबळेश्वर-लिंगमळा मार्गाची दयनीय अवस्था सध्या स्थानिक नागरिकांसोबतच पर्यटकांसाठीही मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रस्त्यांमध्ये जागोजागी खोल खड्डे पडले असून, साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. या अपुऱ्या देखभालीमुळे दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा जीव मुठीत येतो आहे. पर्यटन हंगाम असतानाही प्रशासनाची उदासीन भूमिका नागरिकांमध्ये संताप निर्माण करत आहे.
लिंगमळा धबधबा हा महाबळेश्वरच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असून पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, रस्त्याची बिकट अवस्था ही महाबळेश्वरच्या पर्यटन प्रतिमेला काळीमा फासणारी ठरत आहे. अनेक पर्यटक व व्यापाऱ्यांनी यावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
- शिवसेनेचे आंदोलन : खड्ड्यांत झाडं लावून प्रशासनाला झणझणीत इशारा
प्रशासनाने या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेना (उबाठा गट) आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडं लावून आणि ढोल वाजवून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणाले, महाबळेश्वरसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनस्थळी जर रस्त्यांची अवस्था अशी असेल, तर याचे पडसाद संपूर्ण राज्यावर उमटतील. वारंवार निवेदन दिल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन केवळ आश्वासनांपुरते मर्यादित राहत आहे.
- प्रशासनाचे आश्वासन, मात्र निधीअभावी मर्यादा
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात येईल, असे सांगितले आहे. मात्र, रस्त्याच्या कायमस्वरूपी डांबरीकरणासाठी आवश्यक निधी मंजूर झाल्यावरच काम हाती घेता येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
- शिवसेनेचा इशाराः कारवाई नाही तर आंदोलन तीव्र करणार
जर लवकरात लवकर ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर शिवसेनेने आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाला जाग आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. संपर्कात असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मात्र, यावेळीही आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिल्यास, महाबळेश्वरच्या पर्यटन अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
- व्यापाऱ्यांचा संताप; अपघाताची भीती
स्थानिक व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की पर्यटक परत फिरतात. परिणामी व्यवसायावर मोठा परिणाम होतो आहे. एखादा मोठा अपघात झाला तर जबाबदार कोण? व्यापाऱ्यांनी तातडीने डागडुजी आणि कायमस्वरूपी मजबुतीकरणाची मागणी केली.








