15 ग्रॅमची चेन दोघा भामट्यांनी पळविली : वृद्ध महिला लक्ष्य
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात चेनस्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. शनिवारी दुपारी सर्वोदय कॉलनी, हिंदवाडी येथील एका वृद्धेच्या गळ्यातील 15 ग्रॅमची चेन मोटरसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पळविली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे. केवळ पंधरवड्यात चेनस्नॅचिंगच्या तीन घटना घडल्या आहेत.
शोभा मारुती होनगेकर (वय 67) राहणार सर्वोदय कॉलनी, हिंदवाडी या चालत आपल्या घरी जात होत्या. युद्ध स्मारक गार्डनजवळ घरापासून जवळच मोटरसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील 1 लाख 80 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून घेऊन पलायन केले. एकटा मोटरसायकल सुरू ठेवून बसला होता. तर दुसरा चालत येऊन पाठीमागून सोन्याच्या चेनला हिसडा मारला.
शनिवार दि. 25 ऑक्टोबरच्या दुपारी 12.50 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सुमारे 25 ते 30 वर्षे वयोगटातील दोघा भामट्यांनी मोटरसायकलवरून पलायन केले आहे. घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
भामट्यांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजवरून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. शोभा होनगेकर या वृद्धेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघा अज्ञातांवर टिळकवाडी पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता कलम 304(2) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भामटे स्थानिक आहेत की परप्रांतीय, याचा शोध घेण्यात येत आहे.
पंधरवड्यात चेनस्नॅचिंगच्या तीन घटना
गेल्या पंधरवड्यात चेनस्नॅचिंगच्या तीन घटना घडल्या आहेत. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.20 ते 6.30 या वेळेत गोंधळी गल्ली येथे आशा सहदेव पाटील (वय 78) राहणार गवळी गल्ली, बेळगाव या वृद्धेच्या गळ्यातील 15 ग्रॅमची चेन मोटरसायकलवरून आलेल्या भामट्यांनी पळविली होती. खडेबाजार पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल झाला आहे. त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रामतीर्थनगर येथे चेनस्नॅचिंगची घटना घडली होती. शारदा शंकर कुडची (वय 50) राहणार रामतीर्थनगर या आपली मुलगी स्नेहा हिच्यासह बहिणीच्या घरी लक्ष्मीपूजनासाठी गेल्या होत्या. ओटी भरून घेऊन घरी परतताना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी 35 ग्रॅमचे मंगळसूत्र पळविले होते. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.









